sanjay raut : “प्रत्येकाच्या घरात आज गोडधोड होत असेल…”; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

sanjay raut | Raj-Uddhav Thackeray Alliance : सरकारने महाराष्ट्रातील हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर आयोजित विजयी मेळाव्यानिमित्त तब्बल 20 वर्षांनंतर आज (दि. 5) ठाकरे बंधू एकत्र, एकाच व्यासपीठावर आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत महाराष्ट्राला संबोधित केले.
यावेळी दोघांनीही भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारे देत मराठी भाषा, मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने न पाहण्याचा इशारा दिला. तसेच, यावेळी दोघांनीही आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आणि युती करण्याबाबत संकेत दिले.
आम्हाला एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यांना ही गोष्ट जमली नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट जमली, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला.
संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया :
दरम्यान, आजच्या या मेळाव्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, “सूत्रधार वगैरे काही नसतं. आम्ही राजकारणात आहोत. समाजकारणात आहोत. पक्षात आहोत. कुटुंबासोबत आहोत. आम्ही ठाकऱ्यांसोबत आहोत जन्मत:च.
कुठे काही मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी आमचा प्रयत्न कामी पडत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला. सुदैवाने दोन्ही ठाकऱ्यांशी मी त्याच प्रेमाने बोलू शकतो. बोलत राहिलो. त्यातून आजचं चित्र उभं राहिलं” असं संजय राऊत म्हणाले.
“मला वाटतं की आम्ही आज सण साजरा करत आहोत. नक्कीच आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक मराठी घराघरात या निमित्ताने गोडधोड होत असेल. सण होत असेल. मला घरामध्ये सांगितलं आज इतका मोठा कार्यक्रम होत आहे. आपल्यासाठी आनंदाचा सण आणि क्षण आहे. तुम्ही त्यासाठी सुंदर एक कोट घालून जा. हे मला घरच्यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या घरातील याच भावना आहेत”
उपरोधाने देवेंद्र फडणवीसांना श्रेय दिलं. त्यावर राऊत म्हणाले की, “खरंय ते. मीही देईन. मी त्याच चिडीतून उभा राहिलो. आपण एकत्र आलं पाहिजे. यांना धडा शिकवला पाहिजे. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या शत्रूंना या जिद्दीतूनच माझ्यासारखा कार्यकर्ता मराठी माणसाचा उभा राहिला आणि हे घडून आलं”. असं राऊत म्हणाले.





