संजय राऊत यांनी फ्लॉप शो केला; भाजपच्या मोहित कंबोज यांची टिप्पणी

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानंतर मोहित कंबोज यांनी त्याला पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे स्मगरलशी संबंध काय? असा सवाल करत कंबोज यांनी राऊत यांना चार सवाल केले आहेत.
राऊतांनी इकडचे तिकडचे आरोप करण्यापेक्षा जम्बो कोव्हिड घोटाळ्यातील प्रश्नावर उत्तरे द्यावीत. तसेच प्रवीण राऊत यांनी ईडीला जी माहिती दिली आहे, त्यावर राऊतांनी भाष्य करावे, असे आव्हानच कंबोज यांनी दिले आहे.
मोहित कंबोज यांनी यावेळी संजय राऊत आणि त्यांचा एकत्रित फोटो दाखवला. राऊत दरवर्षी माझ्या घरी गणपतीला येत असतात. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. एवढेच नाही तर त्यांना जेव्हाही आर्थिक मदतीची गरज पडली. तेव्हा मी त्यांना मैत्रीत मदतही केली आहे. पण आता त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास झाला आहे. त्यामुळे ते विसरत आहे, असा हल्ला मोहित कंबोज यांनी चढवला.
राऊत यांनी कंबोज यांना फडणवीसांचा ब्लू आईज बॉय म्हटले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला त्यांनी फडणवीसांचा ब्ल्यू आईज बॉय म्हटले त्याचा मला अभिमानच आहे. फडणवीसांचा प्यून जरी म्हटले असते तरी ते माझे सौभाग्य असते. माझी लॉयलटी पार्टीशी आहे. फडणवीसांशी आहे. पण तुम्ही कुणाचे ब्लूआईज बॉय आहात? ठाकरेंची की पवारांचे? तुम्ही कुणाला लॉयल आहात?, असा खोचक सवालच त्यांनी केला. तुमचे प्रवीण राऊतांशी संबंध उघड झाले, भ्रष्टाचार उघड झाला. म्हणून तुम्ही फ्लॉपशो केला. आम्हाला घामटा फुटेल असे तुम्ही म्हणाला. पण तुम्हालाच घामटा फुटला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.





