Jadeja DRS Flop : ३ वर्ष आणि २२ DRS झाले फेल! कर्णधारासाठी ‘हा’ भारतीय गोलंदाज ठरतोय डोकेदुखी; एकही रिव्ह्यू यशस्वी ठरला नाही
Jadeja DRS Flop : जडेजा डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमच्या (DRS) बाबतीत मात्र पुरता अपयशी ठरताना दिसत असून त्याच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड झाला आहे.

Ravindra Jadeja Unwanted DRS Record 22 Consecutive Failed Reviews In Test Cricket : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आपल्या भेदक फिरकीच्या जोरावर गेली अनेक वर्षे जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. मात्र, एका बाजूला चेंडूने विकेट्स घेणारा जडेजा डिसीजन रिव्ह्यू सिस्टीमच्या (DRS) बाबतीत मात्र पुरता अपयशी ठरताना दिसत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डीआरएस घेण्याच्या बाबतीत जडेजाच्या नावावर एक नकोसा आणि अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
कोलंबोत पुन्हा फसला रिव्ह्यू; सलग २२ वेळा निर्णय कायम!
कोलंबो कसोटीदरम्यान श्रीलंकेचा फलंदाज केषरा नुवांताविरुद्ध जडेजाने पायचीतसाठी (LBW) जोरदार अपील केले. पंचांनी नाबाद दिल्यानंतर जडेजाने कर्णधाराला रिव्ह्यू घेण्यास सांगितले. मात्र, रिप्लेमध्ये चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटची मोठी कड घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसले. या अयशस्वी अपीलासह कसोटी क्रिकेटमध्ये सलग २२ वेळा जडेजाच्या गोलंदाजीवर घेतलेला रिव्ह्यू पंचांचा मूळ निर्णय बदलण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.
१८ वेळा थेट रिव्ह्यू गमावला; जड्डूचा सक्सेस रेट ‘शून्य’!
Ravindra Jadeja is having a tough time with DRS calls in Test cricket. ❌#Cricket #Jadeja #Sportskeeda pic.twitter.com/8UzJoa1c6X
— Sportskeeda (@Sportskeeda) August 25, 2026
या २२ अपीलांची आकडेवारी पाहिली तर भारतीय संघाला तब्बल १८ वेळा थेट आपला रिव्ह्यू गमवावा लागला आहे. तर उर्वरित ४ प्रसंगी ‘अंपायर्स कॉल’ (Umpire’s Call) राहिल्याने भारताचा रिव्ह्यू वाचला, तरी पंचांचा मूळ ‘नाबाद’ निर्णय कायम राहिला. याचाच अर्थ असा की, कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाच्या गोलंदाजीवर घेतलेल्या एकाही रिव्ह्यूमध्ये यश मिळालेले नसून त्याचा सक्सेस रेट चक्क शून्य टक्के राहिला आहे.
२०२३ मध्ये लागला होता शेवटचा DRS; स्वबळावर घेतल्या ८२ विकेट्स!
जडेजाचा हा फ्लॉप शो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. जडेजाने घेतलेला शेवटचा यशस्वी रिव्ह्यू जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लागला होता, जेव्हा त्याने केमार रोचला बाद केले होते. त्यावेळी जडेजाच्या खात्यात २७१ कसोटी विकेट्स होते, तर आज तो ३५३ विकेट्सवर पोहोचला आहे. म्हणजेच मधल्या काळात डीआरएसची कोणतीही मदत न मिळता जडेजाने स्वबळावर तब्बल ८२ फलंदाजांना तंबूत धाडले आहे.





