‘संजय दत्तने काही ग्रेनेड, बंदुका उचलल्या…’; उज्ज्वल निकम यांनी सांगितला ‘९३’च्या बॉम्बस्फोटचा घटनाक्रम

Sanjay Dutt | Ujjwal Nikam – अभिनेता संजय दत्त याला टाडा अंतर्गत दहशतवादी असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते. परंतु शस्त्रास्त्र कायद्याखाली त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याने पुण्यातील येरवडा तुरुंगात त्यांची शिक्षा पूर्ण केली.
शस्त्रांचा शौक असल्याने त्याने एके 47 आपल्याजवळ बाळगली होती. पण आपल्याला एके 47 रायफल मिळाली कुठून, ही गोष्ट त्याने पोलिसांना सांगितली असती, तर पुढे झालेले मालिका बाॅम्बस्फोट झाले नसते, अशी माहिती ज्येष्ठ कायदा अभ्यासक उज्ज्वल निकम यांनी दिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेच्या खासदारपदासाठी नामांकित केलेले वकील उज्ज्वल निकम एका माध्यम समूहाशी बोलत होते. यावेळी निकम म्हणाले की, १९९३ चे साखळी बॉम्बस्फोट झाले नसते. त्या हल्ल्यात २६७ लोकांचा मृत्यू झाला नसता.
संजय दत्तने ज्या वाहनातून एके ४७ घेतली होती, त्या शस्त्रांनी भरलेल्या वाहनाची माहिती त्याने पोलिसांना दिली असती, तर पुढचे काहीच घडले नसते. परंतु मी संजय दत्तला एक साधा माणूस मानतो. मी त्याला निर्दोष मानतो. असं ते म्हणतात.
संजयच्या घरी आली होती एक व्हॅन :
निकम पुढे म्हणाले की, मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. १९९३ मध्ये १२ मार्च रोजी मालिका बॉम्बस्फोट झाला होता. त्याच्या काही दिवस आधी संजयच्या घरी एक व्हॅन आली होती. ती व्हॅन शस्त्रांनी भरलेली होती. त्यात ग्रेनेड आणि एके 47 गन्स होत्या.
ही शस्त्रे अबू सालेमसाठी आणली होती. संजय दत्तने प्रथम काही ग्रेनेड आणि बंदुका उचलल्या. नंतर त्याने सर्व काही ठेवले आणि फक्त एके 47 स्वतःसोबत ठेवली. मात्र, ही माहिती त्याने वेळीच पोलिसांना द्यायला हवी होती.
अशी होती पार्श्वभूमी :
उज्ज्वल निकम २६/११ प्रकरणात वकील होते. या प्रकरणात न्यायालयाने पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती. कसाबबाबत निकम म्हणाले की, ‘कसाबने तुरुंगात बिर्याणीची मागणी केली होती, परंतु ही टिप्पणी राजकीय नेत्यांनी उचलून धरली आणि त्याचे राजकारण केले’.





