Sangli DCC Bank Election : आमदार पडळकरांसह संजय पाटील, घोरपडे व कोरेंची बाजी; रोहीत पाटलांना दोन्ही जागांवर धक्का
Sangli DCC Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ६ जागांच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.

Sangli DCC Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. मिरज सोसायची गटात वसंतदादा गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब कोरे मोठ्या फरकाने जिंकले. (Sangli DCC Bank Election)
तासगावमध्ये सुमनताई पाटील यांचा पराभव करीत संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला, तर तासगावमध्येही रोहीत पाटील समर्थक उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे आमदार रोहित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. अनुसूचित जाती गटातून काँग्रेसचे कृष्णा कांबळे, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून संभाजी कचरे यांनी विजय मिळवला. (Sangli DCC Bank Election)
मंगळवारी मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी पार पडली. सकाळी आठ वाजता निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली.
आठ टेबलवर पंचवीस कर्मचाऱ्यांसह ही मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी केंद्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक मतमोजणी सुरू झाली. साधारण नऊ वाजल्यापासून कल समजण्यास सुरुवात झाली. (Sangli DCC Bank Election)
दहाच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोसायटी गटाचा निकाल अधिकृतरित्या जाहीर केला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. मतदान केंद्र परिसरात गोपीचंद पडळकर व संभाजी कचरे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पडळकर यांच्या समर्थकांनी निकाल घोषित होण्यापूर्वीच गुलालाची आणि फटाके फोडले.
जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ९३.९१ टक्के मतदान झाल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. (Sangli DCC Bank Election)
जतच्या लढतीत पडळकरांचा जोरदार विजय
जत सोसायटी गटातील लक्षवेधी लढतीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ५४ मते मिळवत विनोद पवार यांचा पराभव केला. पवार यांना ३४ मते मिळाली. पडळकर यांनी २० मतांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. (Sangli DCC Bank Election)
कवठेमहांकाळमध्ये घोरपडेंची बाजी
कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी तानाजी पाटील यांच्यावर मात केली. घोरपडे यांना ३७, तर पाटील यांना ३३ मते मिळाली. अवघ्या चार मतांनी घोरपडे विजयी झाले. तानाजी पाटील यानी सामान्य असूनही जोरदार लढत दिली. (Sangli DCC Bank Election)
तासगावमध्ये संजयकाकांचा रोहित पाटलांना धक्का
तासगाव सोसायटी गटातील लढतीत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. संजयकाका पाटील यांना ४०, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. या निकालामुळे आमदार रोहित पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील ही लढत विशेष चर्चेची ठरली. (Sangli DCC Bank Election)
मिरजेत एकनिष्ठ कार्यकर्ते यांचा जोरदार विजय
मिरज सोसायटी गटात काँग्रेस व वसंतदादा गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब कोरे यांनी अनिल शेगुणशे यांच्यावर मात केली. कोरे यांना ४७, तर शेगुणशे यांना १९ मते मिळाली. २८ मतांच्या फरकाने कोरे विजयी झाले. (Sangli DCC Bank Election)
अनुसूचित जाती गटात डाॅ. कदम समर्थक काँग्रेसचे कांबळे
अनुसूचित जाती गटातील मतमोजणीत कृष्णा धोंडी कांबळे यांनी १ हजार ९१४ मते मिळवून विजय मिळवला. विलास पांडुरंग बेले यांना १७६, तर बाबासाहेब मधाळे यांना ११२ मते मिळाली. कांबळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला. (Sangli DCC Bank Election)
विमुक्त जाती गटात जयंत पाटील समर्थक संभाजी कचरे विजयी
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय गटात संभाजी बाबुराव कचरे यांनी १ हजार ९७४ मते मिळवून विजय मिळवला. अमित शंकर पारेकर यांना १८९, तर शंकर माने यांना ४६ मते मिळाली. (Sangli DCC Bank Election)
बाजार समिती आवारात जल्लोष
मतमोजणी सुरू असताना बाजार समितीच्या आवारात उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. निकालाचे कल स्पष्ट होताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी मिशन हॉस्पिटल चौकात जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळण्याची व्यवस्था केली होती. विजयी उमेदवारांना हार घालण्यासाठी क्रेनही लावण्यात आला होता. (Sangli DCC Bank Election)
पहा निकाल एका नजरेत
- जत – गोपीचंद पडळकर-५४
- कवठेमहांकाळ – अजितराव घोरपडे – ३७
- तासगाव – संजयकाका पाटील – ४०
- मिरज – अण्णासाहेब कोरे – ४७
- अनुसूचित जाती कृष्णा कांबळे १,९१४
- विमुक्त जाती संभाजी कचरे १,९७४
जिल्हा बँकेतील पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी
- काँग्रेस – 6
- भाजप – 5
महायुती
- राष्ट्रवादी (शरद) – 4
- शिवसेना – 3
- राष्ट्रीय (अजित) – 3
निवडणूक विभागाचा गोंधळ
जिल्हा बँक निवडणूक प्रक्रीया राबवणारी सहकार विभागाच्या यंत्रणेचा कामाच्या नियोजनात ताळमेळ दिसत नव्हता. मतमोजणी केंद्र परिसरात सीसीटीव्ही असणार असे जाहीर करूनही सीसीटीव्ही लावले नव्हते.
अर्ज माघारीच्या दिवशी तर अर्ज माघारीची वेळ संपल्यानंतर तब्बल पाच ते सहा तासाने अंतिम राहिलेल्या अर्जाची यादी दिली गेली. एकुणच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक विभागाला कारभार गोंधळाचा दिसत होते. केवळ सहा जागांची निवडणूक झाली तीच सर्व जागांसाठी झाली असती तर निवडणूक निर्णय अधिकारी व विभागाची मोठी तारांबळ उडाली असती अशी चर्चा आहे. (Sangli DCC Bank Election)
मतपत्रिकेसोबत पन्नास रुपयाची नोट आणी चिठ्ठी
जत सोसायटी गटाच्या एका मतपत्रिकेसोबत पन्नास रुपयाची नोट मिळून आली. एक चिठ्ठीही मिळून आली त्यामध्ये विधानसभा निवडणुकीवेळी डाॅ.विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी प्रकाश जमदाडे यांना दिलेले आश्वासन पाळले नाही, त्यामुळे तेही नाराज झाले आहेत.
आमदारसाहेब आम्ही लिंगायत समाजाचे आठ मतदार मोठ्या विश्वासाने तुम्हाला मतदान करणार आहोत. तुम्ही विजयी होणार आहात. यापुढे लिंगायत समाजाला तुम्ही बरोबर घेऊन काम करावे. (Sangli DCC Bank Election)
जिल्हा बँकेवर संचालक पदी निवडलेले उमेदवार
सोसायटी गटात विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : आ. डाॅ. विश्वजीत कदम -कडेगाव, महेंद्र लाड -पलूस, देवराज पाटील वाळवा, विराज नाईक शिराळा, तानाजी पाटील – आटपाडी, अमोल बाबर – विटा, आ. गोपीचंद पडळकर जत, अजितराव घोरपडे – कवठेमहांकाळ, संजयकाका पाटील – तासगाव, अण्णासाहेब कोरे – मिरज. महीला राखीव गट अपर्णा देशमुख व वर्षा सावंत, मजुर सोसायटी गट सतिश देशमुख व रणधिर नाईक, प्रक्रीया उद्योग पूजा पाटील, पाणी पुरवठा व इतर संस्था वैभव शिंदे, पतसंस्था गट सम्राट महाडिक, पृथ्वीराज पाटील, इतर मागास गट नितिध होनराव, अनुसूचित जाती – कृष्णा कांबळे, विमुक्त जाती – संभाजी कचरे. (Sangli DCC Bank Election)
चंद्रकांतदादांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष भाजप ठरवणार
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत तालुक्यातील सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी भरघोस मतांनी मिळवलेला विजय हा जतकरांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. आमचे सहकारी कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे सरकार आणि तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन भाजप जो ठरवेल तोच होईल. भाजपचे नेतृत्व जो निर्णय घेईल, तो सर्वमान्य असेल. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी भाजप सक्षमपणे पुढाकार घेईल.
– सम्राटबाबा महाडीक – भाजप सांगली जिल्हाध्यक्ष





