Credit Society : शिरूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात आपल्या यशस्वी वाटचालीची २५ वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून संस्थेच्या जांबूत (ता. शिरूर) शाखेमध्ये रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) उत्साहात अनावरण करण्यात आले. संपदा पतसंस्थेने गेल्या अडीच दशकांपासून पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभाराच्या जोरावर सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे यांनी सांगितले की, मार्च २०२६ अखेर संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली असून, संस्थेच्या ठेवी १०२ कोटी ४३ लाखांवर पोहोचल्या आहेत. तसेच, ७९ कोटी २९ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले असून, संस्थेकडे १८ कोटी रुपयांचा भक्कम स्वनिधी उपलब्ध आहे. पुणे, अहिल्यानगर, रायगड, ठाणे आणि बृहन्मुंबई अशा विस्तृत कार्यक्षेत्रात पसरलेल्या या संस्थेने १५ शाखांच्या माध्यमातून सभासदांचे जाळे विणले आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय शिरूर येथे असून, जांबूतसह पिंपरखेड, संविदणे, कवठे येमाई, मलठण, कान्हूर मेसाई, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, न्हावरे, वडगाव रासई आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण थेरपाळ, निघोज, आळकुटी, वडझिरे अशा १५ शाखांमार्फत संस्था कार्यरत आहे. केवळ बँकिंग व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जपत छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपतराव वाळूंज यांनी नमूद केले. तसेच, आगामी काळात ग्राहकांना अधिक आधुनिक आणि दर्जेदार बँकिंग सुविधा पुरवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अमित गव्हाणे, संचालक माधव गोरडे, पांडुरंग कारखिले, सदाशिव पाबळे, गहिनीनाथ गोरडे, तसेच जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, सोसायटीचे अध्यक्ष आनंद जगताप, बाळासाहेब पठारे, अर्जुन महाराज वाळूंज, पोपट फिरोदिया, राहुल जगताप, गोरख गाजरे, डॉ. शाकुराव कोरडे, सुभाष कोरडे, बाजीराव चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व ग्राहक उपस्थित होते. संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नातूनच संस्थेला आजवर विविध मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.