मुंबई : समीर वानखेडे धारावी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. समीर वानखेडे निवडणूक लढत असल्यामुळे ते पुन्हा एकदा नवाब मलिकांच्या निशाण्यावर आले आहेत. वानखेडे हे आपली नोकरी वाचवण्यासाठी निवडणूक लढत आहेत, असा दावा मलिक यांनी केला. सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरू आहे. उच्च न्यायालयाकडून तात्पुरते संरक्षण मिळाले आहे. मी त्यांचा उघड केलेला फर्जीवाडा सत्य ठरला असून आपल्याला संरक्षण मिळण्यासाठी ते राजकारणात आले आहेत, असेही मलिक म्हणाले. समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर असताना शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणात वानखेडेंनी आर्यन खानला अटक केली होती. मात्र, हे संपूर्ण प्रकरण बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. मलिक पुढे म्हणाले की, मी समीर वानखेडे यांचा फर्जीवाडा उघड केला होता. तो सत्य ठरला आहे. सीबीआयने वानखेडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांना या प्रकरणात तात्पुरता जामीन मिळाला आहे. फर्जीवाडा करणाऱ्यांना लोकं मते देणार नाहीत. त्यांची नोकरी जाणारच आहे. त्यामुळे संरक्षण मिळण्यासाठी ते राजकारणात उतरले असून निवडणूक लढवत आहेत. जे पेरले तेच उगवणार आहे. शिवाजीनगर-मानखुर्द मधून लढणार आपण निवडणूक लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. मंगळवारी, मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ते म्हणाले. या मतदारसंघात माझा होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात लोकांना घाबरवणे, धमकावणे, पैसे उकळणे असे चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणारे राजकारण या भागात घडत आहेत. अंमली पदार्थ हा या मतदारसंघातील मुख्य प्रश्न आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.