Sambhaji Maharaj Punyatithi : शंभूराजांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; मुख्यमंत्र्यांसह ‘हे’ दिग्गज उपस्थित राहणार
Sambhaji Maharaj Punyatithi : १८ मार्च रोजी वढु बुद्रुकमध्ये पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती.

Sambhaji Maharaj Punyatithi – वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त बुधवार (दि.१८) मार्च रोजी श्री संभाजी महाराज समाधिस्थळी पूजाभिषेक, मुकपदयात्रा, शासकीय पूजा, कीर्तन, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, धर्मसभा, पुरस्कार वितरण, रक्तदान शिबिर व छावा महानाट्यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आहे.
वढु बुद्रुक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंच ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पहाटे पाच वाजता श्री शंभू छत्रपतींच्या तसेच कविकलश यांच्या समाधीची महापूजा, सकाळी ७ वाजता मुकपदयात्रा होईल, ८.३० वाजता शासकीय पूजा व ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांचे किर्तन तसेच सकाळी ११.४५ वाजता शासकीय मानवंदना व वेदमंत्र पठणासह श्री शंभुछत्रपतींच्या समाधिवर हेलीकॅाप्टरने पुष्पवृष्टी तसेच १२.३० वाजता धर्मसभा होणार आहे,
राष्ट्रसंत दत्तभक्त भाऊ महाराज परांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या धर्मसभा व पुरस्कार वितरण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवरायांचे १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शंभु छत्रपतींचे वंशज वृषालीराजे भासले, सेवानिवृत्त आय. जी. नाशिक शेखर पाटील, मराठा महासंघाचे नरेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहे.
दरम्यान १७ मार्च रोजी ॲड. शिवाजी वाळके यांच्या नेतृत्वाखाली गायत्री यज्ञाचे आयोजन केले असून दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या संख्येने येणाऱ्या शंभुभक्तांना महाप्रसाद देण्याचा संकल्प धर्मवीर संभाजी महाराज युवा मंचने केला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे समाधिस्थळावर रक्तदान महायज्ञाचे आयोजनही केले आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळीत छावा हे महानाट्यही सादर करण्यात येणार आहे.
शंभुराजांच्या समाधिवर विक्रमी संख्येने उपस्थित राहून पुष्पवृष्टी करावी, शिवशंभू छत्रपतींचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात यावा, वढु येथील स्मारकाचे काम वेगात व्हावे अशा मागण्याही स्मृती समिती तसेच युवा मंचच्या वतीने केले. यावेळी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, लक्ष्मण भंडारे, समिती सदस्य रमेश भंडलकर , शांताराम भंडारे, सचिन भंडारे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे, अनिल भंडारे, अॅड. बाळासाहेब भंडारे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारांचे वितरण
यावर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार आमदार संग्राम जगताप यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, जीवनचरित्रवरील ग्रंथाचा संच, ५१ हजार व महावस्त्र देऊन गौरविणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शंभुसेवा आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना व शंभुसेवा पुरस्कार श्रीक्षेत्र मढी कानिफनाथचे सरपंच संजय मरकड, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक निलेश गुलाबराव तरस, शिवसेनेचे शाखाप्रमुख राजेंद्र बाळासाहेब तरस तर शंभूतेज पुरस्कार हवेली पंचायत समितीचे सदस्य कुशल सातव यांना देण्यात येणार आहे.






