Pimpri : छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम महिन्याभरात पूर्ण होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे ४० फूट उंच चौथाऱ्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा 100 फूट उंचीचा कांस्य धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. हे काम वेगात सुरू असून आॅक्टोबरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंचीचा कांस्य धातूचा पुतळ्यासाठी 32 कोटी 84 लाख रूपये खर्च झाला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या दिल्ली येथील फॅक्टरीत तयार केलेला संभाजी महाराज पुतळ्याचे कांस्य धातूचे सुटे भाग उभारणीच्या ठिकाणी आणून प्रत्यक्ष पुतळा उभा केला जात आहे. आत्तापर्यत पुतळ्याच्या जिरेटोपासह तलवार अन्य असे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याला पॉलिसींग व कोटींग करून रंग दिला जात आहे.
पुतळ्यासाठी 15 कोटी खर्च करून 40 फूट उंचीच्या चौथरा बांधण्यात आला आहे. यामध्ये पुतळ्याच्या चौथर्याचे जीएफआरसी काँक्रीटऐवजी दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी 41 लाख 27 हजार रूपयांचा वाढीव खर्च केला जाणार आहे. पीएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएने 2.5 एकर जागा महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. ते काम धनेश्वर कन्स्ट्रक्शनमार्फत सुरू आहे.
पुतळ्याभोवती मावळे व सैनिकांचे पुतळे असणार आहेत. पुतळाभोवती उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. आकर्षक ध्वनी व विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील मुख्य प्रसंगांवर आधारित म्युरल्स उभारले जाणार आहेत. संभाजी महाराज यांच्या जीवनावरील तसेच, ऐतिहासिक साहित्य व शस्त्रांचे एक संग्रहालय बांधण्यात येणार आहे. परिसराचे सुशोभिकरण करून उद्यानही विकसित केले जाणार आहे. अॅम्पी थिएटर, सुशोभिकरण, विद्युत रोषणाई, प्रेक्षक गॅलरी, स्वच्छतागृह, नवीन तंत्रज्ञानावर आधारित कलाकृती साकारण्यात येणार आहेत. सुबक कलाकसुरीची सजावटही केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 20 ते 25 कोटींची निविदा असण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट
स्मारकाच्या परिसरात ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हॅर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) या अत्याधुनिक आभासी तंत्रज्ञानाच्या वापर करून छत्रपत्री संभाजी महाराज यांच्या जीवनपट उलगडण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध ऐतिहासिक घटना, त्यांचे बुद्धीकौशल्य, मृत्यूपूर्व जीवन संघर्ष, वस्त्रप्रावरण, त्यांची धर्मनिष्ठा, मुघलाविरुद्ध लढाई, त्याक आदी बाबींचा अधिक जिवंतपणे अनुभव घेण्यासाठी एसआर व व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ते काम लेमन डिजाईन प्रा. लि. एजन्सी करणार आहे.उलगडणार





