Vijay Hazare Trophy : ३२ चेंडूत शतक! सकीबुल गनीने मोडले सर्व विक्रम; इशान-वैभवलाही टाकले मागे

Vijay Hazare Trophy 2025 Records : सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला असून, एकाच दिवशी अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत. बुधवारी अवघ्या काही तासांच्या अंतरात क्रिकेट विश्वाला तीन अतिवेगवान शतके पाहायला मिळाली. यामध्ये बिहारच्या सकीबुल गनीने अवघ्या ३२ चेंडूत शतक झळकावून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
पहिल्याच दिवशी विक्रमांची चढाओढ –
दिवसाची सुरुवात बिहारच्या १४ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या वादळी खेळीने झाली. वैभवने अवघ्या ३६ चेंडूत शतक पूर्ण करत खळबळ उडवून दिली. मात्र, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही तासांनंतर झारखंडचा कर्णधार इशान किशनने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्नाटकविरुद्ध केवळ ३३ चेंडूत शतक ठोकून वैभवचा विक्रम मोडला. पण खेळाच्या अखेरीस बिहारचा कर्णधार सकीबुल गनीने या दोघांनाही मागे टाकले. गनीने अवघ्या ३२ चेंडूत शंभरी गाठून नवा इतिहास रचला.
इशान किशनची प्रचंड फटकेबाजी –
नुकतेच झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकवून देणारा इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या सामन्यात तो मधल्या फळीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. इशानने ३९ चेंडूंत ३२०.५१ च्या स्ट्राईक रेटने १२५ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ७ चौके आणि १४ उत्तुंग षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे झारखंडने ५० षटकांत ४१२ धावांचा डोंगर उभा केला. इशानच्या या फॉर्ममुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याच्या निवडीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
बिहारचा ५७४ धावांचा ऐतिहासिक धावसंख्या –
दुसरीकडे, बिहारच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. वैभव सूर्यवंशीने ८४ चेंडूत १९० धावांची (१६ चौकार, १५ षटकार) खेळी केली. कर्णधार सकीबुल गनीने ४० चेंडूत नाबाद १२८ धावा केल्या, तर आयुष लोहारुकाने ५६ चेंडूत ११६ धावांचे योगदान दिले. या त्रिकुटाच्या शतकांमुळे बिहारने ५० षटकांत ६ बाद ५७४ धावांचा विक्रमी धावसंख्या उभारली.





