Sant Eknath Maharaj : संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीयात्रेला उद्यापासून होणार प्रारंभ

पैठण : संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठीयात्रेला उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. नाथ मंदिरात ५७ सीसीटीव्ही तर शहरातील इतर ठिकाणी असलेल्या शंभर सीसीटीव्हीसह ७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच साडेचारशे एसटी बसेससह तब्बल एक हजार राहुट्यांमधून पाच लाख वारकरी नाथषष्ठीच्या तीन दिवसीय सोहळ्यासाठी पैठणनगरीत दाखल होणार आहेत.
यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले. गोल नाका परिसर, सह्याद्री नाका परिसर, दक्षिण काशी मैदान, धरण परिसर तसेच संत ज्ञानेश्वर उद्यान समोरील प्रांगण या ठिकाणी बाहेरून येणारी सर्व वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून फराळवाटप केले जाणार आहे. पालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
दरम्यान, २० मार्च फाल्गुन रोजी पहिली मानाची निर्याण दिंडी परंपरेप्रमाणे सकाळी ११ वा. गावातील नाथमंदिरातून निघून नाथ समाधी मंदिरात जाईल. त्या ठिकाणी परंपरेप्रमाणे गाभाऱ्यात श्री संत एकनाथ महाराज समाधी सोहळ्याचे नारदीय कीर्तन होईल. यानंतर २१ मार्च फाल्गुन रात्री १२ वा.परंपरेप्रमाणे गावातील नाथमंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या पादुकांचा छबिना श्री मधुसूदनबुवा गोसावी हे काढतील. छबिन्यापुढे श्री रघुनायबुवा पालखीवाले यांची दिंडी असेल. २२ मार्च फाल्गुन रोजी मानाची काल्याची दिंडी दुपारी नाथमंदिरात जाईल.





