वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी उपसरपंच संदीप सातव आणि रत्नमाला सातव यांच्या पुढाकाराने वाघोली, खराडी, चंदननगर, विमाननगर आणि लोहगाव येथील नागरिकांसाठी मोफत आयोध्या-काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले. हजारो नागरिकांनी मोफत रेल्वे प्रवासाद्वारे आयोध्या येथील राम मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. या अनोख्या उपक्रमासाठी नागरिकांनी दाभाडे, भाडळे आणि सातव यांचे आभार मानले आहेत. याशिवाय, या नेतेमंडळींनी वाघोली, खराडी, चंदननगर, विमाननगर आणि लोहगाव येथील नागरिकांसाठी मोफत उज्जैन यात्रेचेही आयोजन केले आहे. या सामाजिक कार्यासाठी केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, आमदार माऊली कटके, माजी आमदार जगदीश मुळीक आणि पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.