शिरूर: बेट भागात यात्रांचा जल्लोष; श्रद्धा, संस्कृती आणि उत्साहाचा अनोखा मेळ

शिरूर- शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या उत्सवी रंगांनी बहरला आहे. एप्रिल महिन्याच्या आगमनाबरोबरच या भागातील गावांमध्ये पारंपरिक यात्रा आणि जत्रांचा थाट सुरू झाला आहे. गावकऱ्यांचा उत्साह आणि बाहेरगावी असलेल्या लोकांची मायदेशी परतण्याची ओढ यामुळे या उत्सवांचा नाद सर्वत्र घुमत आहे.
या यात्रांमध्ये कीर्तन, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा आणि कुस्त्यांचे जंगी सामने यांसारखे रंगारंग कार्यक्रम पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी खेळणी आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्ससह महिलांसाठी खास बाजारही भरवले जातात, जिथे विविध वस्तूंची खरेदी-विक्री होते. फाकटे, वडनेर, पिंपरखेड, निमगाव दुडे, म्हसे, सविंदणे, कवठे येमाई, कान्हूर मेसाई, टाकळीहाजी, जांबुत, चांडोह या गावांमध्ये सध्या यात्रांचा जल्लोष सुरू आहे. विशेष बाब म्हणजे पुणे, मुंबईसारख्या शहरांत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोकही आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी गावाकडे परतत आहेत.
सविंदणेतील भैरवनाथ यात्रेचा उत्साह शिगेला
सविंदणे येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या जागृत देवस्थानाची यात्रा यंदा ११ आणि १२ एप्रिल रोजी साजरी होणार आहे. सरपंच मनिषा नरवडे आणि भैरवनाथ छबिना मंडळाने याबाबत माहिती दिली. पहिल्या दिवशी सकाळी कीर्तन, मांडव डहाळे, श्री विवाह सोहळा, बैलांची मिरवणूक आणि दुपारी १० ते ६ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यत होईल. रात्री ८ ते ११ या वेळेत शेरणी, त्यानंतर देवाचा छबिना आणि पालखी सोहळा रंगेल. दुसऱ्या दिवशी हनुमान जन्मोत्सव, तमाशाचा लोकप्रिय कार्यक्रम आणि दुपारी कुस्त्यांचा थरारक आखाडा आयोजित आहे.
कवठे येमाई येथे येमाई देवी यात्रेची लगबग
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येमाई देवीचा यात्रोत्सव कवठे येमाई येथे १२ आणि १३ एप्रिल रोजी होणार आहे. पुणे, मुंबई, नाशिक येथून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. धार्मिक पूजन, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उत्सव खुलणार आहे.
कान्हूर मेसाईत मेसाई देवी यात्रेची तयारी जोरात
कान्हूर मेसाई येथील श्री मेसाई देवीचा यात्रोत्सव १३ आणि १४ एप्रिल रोजी साजरा होईल. या उत्सवासाठी परिसरातील भाविकांची गर्दी जमणार असून, पारंपरिक पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. या यात्रांनी बेट भागात आनंदाचे आणि श्रद्धेचे वातावरण पसरले आहे. परंपरा आणि उत्साहाचा हा संगम प्रत्येकाला अनुभवायला मिळत आहे.





