वाल्हे : पुरंदर तालुक्यातील वाल्हे पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेला शनिवार (दि. 19) पासून प्रारंभ होणार असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार, सचिव शशिकांत दाते यांनी दिली. शनिवारी, कुंभारवाडा येथून देवाचे प्रस्थान होऊन सायंकाळी 5 च्या दरम्यान देव देवळात येणार, यावेळी देऊळवाड्यातील स्वागत कमानी, मंदिर परिसरातील बांधकाम, विद्युत रोषणाई तसेच नयन मनोहारी फुलझाडांची सजावट यंदाच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तर आकाशाला गवसणी घालणार्या मानाच्या कावडी व देवाच्या पालखीचे देखणे रूप. रविवारी (दि. 20) दुपारी 3 वाजता प्रथमेश मोरे म्युसिकल इव्हेंट, सायंकाळी देवाला मुंडवळी व पोशाख चढवून, सायंकाळी साडे पाच ते सात या वेळेत देवाच्या हळदीचा कार्यक्रम, त्यानंतर प्रसाद म्हणून देवाचे वाण वाटण्यात येणार, सायंकाळी सात वाजता माऊली महाराज पाटाडे यांचे कीर्तन सेवा. सोमवारी (दि. 21) चैत्र कृष्ण कालाष्टमी हा यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे 4.30 ते 5 दरम्यान महापूजा होऊन भाविकांसाठी मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात येणार यावेळी श्री भैरवनाथ मंदिरात आरती, महापूजा, अभिषेक दंडवत घेणे, वस्त्र अलंकार तसेच नवस व नवसाची पूर्तता अशा विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. पहाटे पाच वाजता विघ्नहर्ता फायर वर्क्स, साडेपाच वाजता सुरमई पहाट यामध्ये भक्तीगीत,भावगीत व चित्रपट अनोखी मैफिल कार्यक्रम देखील होणार आहे. यानंतर दुपारी देवाचा छबिना आटोपल्यावर देवाला बाशिंग व लग्नाचा पोशाख चढवून मानकरी, सालकरी, ब्राह्मण, पुजारी व असंख्य मान्यवरांच्या साक्षीने ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा सायंकाळी 6.53 मिनिटांनी शाही थाटात संपन्न होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी सचिन आगलावे, सचिन देशपांडे यांनी दिली. लग्न सोहळ्यानंतर देवाची भाकणूक केली जाणार असून रात्रीच्या वेळी पुन्हा छबिना रंगणार आहे. मंगळवार ते गुरुवार पर्यंतचे कार्यक्रम मंगळवारी (दि.22) दुपारनंतर, छबिना, देवकार्य होईल.सायंकाळी 7 वाजता राधा पाटील ण्ड ग्रुप यांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (दि. 23) सायंकाळी 4 ते 7 या वेळेत साड छबिना, सायंकाळी 7 वाजता क्रांतीनाना मळेगावकर यांचा महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम, रात्री देवाची वरात काढण्यात येणार आहे. गुरुवार (दि. 24) सायंकाळी 4 च्या दरम्यान जंगी कुस्त्या यानंतर, ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रेय पवार, सचिव शशिकांत दाते यांनी सांगितले.