Jamkhed News : पोलिसांच्या दिरंगाईमुळे ‘सागर मोहळकर हत्याकांड’ प्रकरणाला धक्कादायक वळण, मुख्य आरोपीला ‘वैधानिक जामीन’ मंजूर
Jamkhed News : महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या सागर मोहळकर हत्याकांड प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

Jamkhed News : महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या सागर मोहळकर हत्याकांड प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील अटक आरोपी अभिमन्यु महादेव पोते याला जामखेड न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर भाषेत याला ‘वैधानिक जामीन’ म्हटले जाते. (Jamkhed News)
ज्या गंभीर गुन्ह्याचा जामीन केवळ सत्र न्यायालयात होणे अपेक्षित असते, त्या आरोपीला पोलिसांच्या तांत्रिक चुकीमुळे जामखेडच्या कनिष्ठ न्यायालयातूनच जामीन मिळाला आहे. जामखेड न्यायालयाच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. (Jamkhed News)
पै सागर मोहळकर हत्याकांडाप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. (Jamkhed News)
या गुन्ह्यात आरोपी अभिमन्यु महादेव पोते याला ९ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. १३ मार्च २०२६ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (ज्युडिशियल कस्टडी) करण्यात आली होती. (Jamkhed News)
कायद्यानुसार, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटक केल्यापासून ९० दिवसांच्या आत तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करणे बंधनकारक असते.आरोपी अभिमन्यु पोते याच्या अटकेला ७ जून २०२६ रोजी ९० दिवस पूर्ण झाले होते. (Jamkhed News)
त्यामुळे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (PI) दशरथ चौधरी यांनी या मुदतीत किंवा ८ जून २०२६ (९१ व्या दिवशी) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे होते, परंतु ते वेळेत दाखल झाले नाही. (Jamkhed News)
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेली हीच तांत्रिक दिरंगाई आरोपीचे वकील ॲड. हर्षल डोके यांनी अचूक हेरली. ९० दिवसांची मुदत संपताच, त्यांनी तातडीने जामखेड न्यायालयाच्या न्यायाधीश यु. ए. भोसले यांच्यासमोर आरोपीला ‘वैधानिक जामीन’ मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. (Jamkhed News)
या अर्जावर न्यायालयाने कोर्टाच्या नाझर (प्रशासकीय अधिकारी) यांचे म्हणणे मागवले असता, त्यांनीही न्यायालयात अद्याप कोणतीही चार्जशीट दाखल झाली नसल्याचे स्पष्ट केले. (Jamkhed News)
न्यायालयासमोर सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वतीने ॲड. हर्षल डोके यांनी जोरदार युक्तिवाद केला. ९० दिवसांत चार्जशीट दाखल न झाल्यास आरोपीला वैधानिक जामीन मिळणे हा त्याचा कायदेशीर हक्क ठरतो, हा ॲड. डोके यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. (Jamkhed News)
न्यायाधीश श्रीमती यु. ए. भोसले यांनी आरोपी अभिमन्यु पोते याला अटी व शर्तींसह जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. याचवेळी न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास अधिकारी (PI) दशरथ चौधरी यांना ‘दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर का झाला?’ याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Jamkhed News)
एवढ्या मोठ्या आणि गाजलेल्या हत्याकांडातील आरोपीचा जामीन सहसा सत्र न्यायालयातूनच मंजूर केला जातो. मात्र, जामखेड पोलिसांकडून वेळेत चार्जशीट दाखल न झाल्यामुळे आरोपीला थेट कनिष्ठ न्यायालयातूनच कायदेशीर हक्काच्या आधारे जामीन मिळाला आहे. (Jamkhed News)
पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे कायदेशीर वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून, पोलिसांच्या कामगिरीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Jamkhed News)





