पिंपरी | पवना धरणाची सुरक्षा रामभरोसे

पवनानगर,(वार्ताहर) – मावळसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणात ९० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणातून विसर्ग सुरू आहे.
पवना धरणाचा भरलेला जलाशय आणि सुरू असलेला विसर्ग यामुळे हे दृश्य अत्यंत सुंदर दिसत आहे. त्यामुळे हे चित्र टिपण्यासाठी धरणाच्या बंधाऱ्यावर विना परवाना ड्रोन कॅमेरे फिरत आहेत.
पवना धरणाच्या अधिकाऱ्यांकडून देखील याकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे पवना धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे.
धरण परिसराचे विनापरवाना चित्रिकरण
पवना धरणातून सध्या विसर्ग सुरू असून याचे ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यात आले आहे. हे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशातील जलाशयांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना आणि प्रतिबंध करण्यात आले आहेत.
असे असतानाही पवना धरणाचे ड्रोनद्वारे चित्रिकरण झाले. विशेष म्हणजे हे चित्रिकरण विना परवाना झाल्याचे समजते. चित्रिकरणादरम्यान धरणाचे सर्व दरवाजे, मुख्य विद्युत केंद्र, कार्यालय यांचेही चित्रिकरण झाल्याचे दिसत आहे. हे होत असताना धरणाचे संबंधित कुणीही अधिकारी, कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते.
धरणाचे सुरक्षारक्षक गायब
साल १९९२ मध्ये जेव्हा देशात बॅाम्बस्फोट झाले, तेव्हापासून प्रत्येक धरणाला सुरक्षा देण्यात आली. राज्य सरकारकडून पवना धरणासाठी स्वतंत्र पोलीस सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आता मात्र येथे कुणीही सुरक्षा रक्षक दिसून येत नाही.
इतकेच नाही तर ड्रोनने चित्रिकरण होत असताना तिथे एकही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता, असे समजते. मुळात धरण परिसरात दोन किलोमीटर अंतरावर ड्रोन कॅमेऱ्याला परवानगी नसताना चित्रिकरण झाले कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे येथील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
पवना धरणाच्या दरवाजाद्वारे धरणातील पाणी पवना नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यावेळी कुणीतरी पवना धरणाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याबाबत मला माहिती मिळाली आहे.
याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असून ज्यांनी चित्रीकरण केले, त्यांचा शोध सुरू आहे. तसेच याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहोत. – रजनीस बारिया, शाखा अभियंता, पवनाधरण पाटबंधारे विभाग.





