नवी दिल्ली – निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने “भारतरत्न’ने सन्मानित विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला बुधवारी “राष्ट्रीय आयकॉन” म्हणून नियुक्त केले आहे. बुधवारी येथे तेंडुलकर आणि मतदान समिती यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तीन वर्षांच्या कराराचा भाग म्हणून तेंडुलकर मतदार जागृती करणार आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आयोग आणि तेंडुलकर यांच्यामधील हे सहकार्य आगामी निवडणुकीत, विशेषत: 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (लोकसभा), मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल. तरुणांवर असलेल्या तेंडुलकरच्या अतुलनीय प्रभावाचा लाभ घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या वर्षी आयोगाने अभिनेता पंकज त्रिपाठी यांना राष्ट्रीय आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. यापूर्वी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, महेंद्रसिंह धोनी, आमिर खान आणि मेरी कोम सारखे दिग्गज निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय मानचिन्ह होते.