Sachin Tendulkar : महानतेचे वरदान लाभलेल्या फलंदाजाची पन्नाशी…

पुणे – सचिन … सचिन… ही राष्ट्रीय घोषणा कधी बनली, तो चाहत्यांच्या ह्रदयात स्थान मिळवता कधी बनला इथपासून ते आज वयाची पन्नाशी पूर्ण करतानाचा सचिन आजही गळ्यातील ताईतच बनून राहिला आहे. शारजामध्ये वाळूचे वादळ येऊन गेल्यावर ऑस्ट्रेलियाला सचिनच्या फलंदाजीच्या वादळाचा फटका बसला. त्याच त्याच्या डेझर्ट स्ट्रॉम शतकाचीही आज पंचवीशी पूर्ण होत आहे. हा दुहेरी योग जुळून आला आहे.
सचिन आपली पत्नी अंजली व मुलगी सारासह गोव्यात दाखल झाला असून तेथेच एका जंगी सोहळ्यात तो आपली पन्नाशी साजरी करणार आहे. मुलगा अर्जुन मात्र त्याच्या या खास दिवशी उपस्थित राहू शकेल का नाही याबाबत अद्याप माहिती नाही. तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धेत खेळत असल्यामुळे त्याला उपस्थित राहता येणार नसल्याचेही सांगितले जात आहे. शारजाच्या मैदानावर 1998 साली 24 एप्रिललाच आपल्या वाढदिवशी सचिनने ती ऑस्ट्रेलियाविरुद्धची गाजलेली शतकी खेळी केली होती.
त्याला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण देशाचा लाडका सचिन पन्नाशी साजरी करत असताना या विक्रमाचीही पंचवीशी साजरी करणार आहे. सुनील गावसकर यांच्यापासून भारतीयच नव्हे तर जगभरातील खेळाडू तसेच अन्य नामवंत व्यक्तींनीही सचिनला खास शुभेच्छा दिल्या आहेत. एज इज जस्ट अ नंबर असे म्हणणाऱ्या सचिनने त्याच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. असेच प्रेम व पाठिंबा कायम असू दे, असे सचिनने आपल्या संदेशात म्हटले आहे.
शनिवारी मुंबई व पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यानच सचिनने वाढदिवसाचा केक कापला होता. हा खास क्षण मुंबई इंडियन्सने आयोजित केला होता. यावेळी वानखेडे स्टेडियमवर सचिनचा मुखवटा घालून जवळपास 30 हजार चाहते मैदानात उपस्थित होते व सचिन … सचिन .. असा जयघोष सुरु होता.
अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून सचिनला आता जवळपास दहा वर्षे होत आहेत तरीही त्याच्या नावाची जादू अद्याप कायम असल्याचेच चित्र दिसत होते. आता चाहत्यांना उत्सूकता लागली आहे ती आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या पन्नाशीच्या सोहळ्याची व तो गोव्यात कशा पद्धतीने होणार याची. कारण ब्रायन लारा असो किंवा आताचा विराट कोहली असो, हे सगळेच क्रिकेटपटू आहेत पण सचिन भावना आहे.





