sachin chandwade: धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या; ‘असुरवन’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच संपवलं आयुष्य

sachin chandwade : २५ वर्षीय मराठी अभिनेता सचिन चांदवडे याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेडे गावचा रहिवासी असलेला सचिन हा मेहनती आणि कलाप्रेमी कलाकार म्हणून ओळखला जायचा. त्याच्या अचानक निधनाने मराठी मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
सचिन चांदवडे हा फक्त २५ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र त्याचा आगामी चित्रपट ‘असुरवन’ लवकरच प्रदर्शित होणार होता, आणि त्याचवेळी त्याने आयुष्य संपवल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
सचिनने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं आणि तो पुण्यातील आयटी पार्कमध्ये नोकरी करत होता. नोकरीसोबतच अभिनयाची आवड जोपासत तो वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये सहभागी व्हायचा. त्याने ‘जमतारा २’ या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेबसीरिजमध्येही भूमिका साकारली होती.
तसेच, सचिन जळगावमधील ढोल-ताशा पथकात सक्रिय होता आणि सणासुदीच्या काळात तो वादन करून आपल्या कलागुणांनी सर्वांना प्रभावित करायचा. त्याने ‘विषय क्लोज’ या चित्रपटातही काम केलं होतं.
सोशल मीडियावर तो आपल्या चाहत्यांशी नेहमी संपर्कात राहायचा. मेहनती, हरहुन्नरी आणि उत्साही असा हा तरुण कलाकार आता आपल्यात नाही, याचं दुःख जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण मराठी कलाजगताला झालं आहे.
सचिन चांदवडे यांच्या आत्महत्येमुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेकांनी समाज माध्यमांवरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.




