किव्ह – रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी प्रस्तावित केलेल्या थेट चर्चेला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या चर्चेला स्वतः पुतीन येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या प्रयत्नातून रशिया-युक्रेन थांबण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. जरी रशियाबरोबर १५ मे रोजी चर्चा होणार असली, तरी सोमवारपासूनच युद्धबंदी लागू होईल, अशी आशा झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. युक्रेनबरोबर युरोपातल्या प्रमुख देशांच्या नेत्यांनी रशियाने सोमवारपासून ३० दिवसांची बिनशर्त युद्धबंदी स्वीकारावी, म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र रशियाने ही मागणी फेटाळून लावली आणि त्याऐवजी थेट चर्चेची मागणी मान्य केली. चर्चेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी झेलेन्स्की यांनी काही अट घातली आहे का हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच चर्चेला स्वतः पुतीन उपस्थित राहणार आहेत, का नाही हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात युद्धाला सुरुवात झाली, तेंव्हा झेलेन्स्की यांनी वारंवार पुतीन यांच्याशी थेट चर्चेची मागणी केली होती. मात्र पुतीन यांनी ही मागणी फेटाळली होती. त्यापुढच्या काळात त्यांनी आपल्याशी थेट चर्चेची कोणतीही शक्यताही निर्माण होऊ दिली नव्हती. पुतीन यांनी थेट चर्चेचा प्रस्ताव मांडल्यावर युक्रेनने हा प्रस्ताव स्वीकारावा, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. ही चर्चा होऊ शकते का नाही, हे तरी पडताळून बघितले जावे, असे ट्रम्प म्हणाले होते. काही दिवसांपुर्वी युक्रेनमध्ये गेलेल्या फ्रान्स, ब्रिटन, पोलंड आणि जर्मनीच्या नेत्यांनीही युद्धबंदीच्या मागणीचा आग्रह धरला होता. जर पुतीन यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही तर रशियावर एकत्रित निर्बंध घालण्याचा इशाराही या नेत्यांनी दिला होता. पुतीन आणि झेलेन्स्की यांची २०१९ मध्ये भेट झाली होती. त्यानंतर थेट चर्चा घडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. आता थेट चर्चेसाठी पुतीन यांनीच पुढाकार घेतला आहे. पुतीन यांनी रविवारी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी चर्चा केली, पुतीन यांच्या इच्छेप्रमाणे चर्चेचे आयोजन करण्याची तयारी एर्दोगन यांनी दर्शविली आहे.