russia-ukraine war : पुतीन – झेलेन्सकींवर ट्रम्प वैतागले; रशिया-युक्रेन युद्धबंदीविषयी चर्चा करणार

वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन दरम्यान युद्धबंदी घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवरून चर्चा करणार आहेत. मात्र त्यापुर्वी ट्रम्प या दोन्ही नेत्यांवर वैतागले असल्याचे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी म्हटले आहे.
सोमवारची चर्चा सकारात्मक आणि आशादायक असेल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांनी नाटोच्या नेत्यांशीही या संदर्भात फोनवरून चर्चा केली आहे. मात्र जर पुतीन वाटाघाटींमध्ये गंभीर नसल्याचे दिसून आले तर ट्रम्प यांना या चर्चेमधून माघार घ्यावी असे वाटू लागले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जे.डी.वान्स यांनी म्हटले आहे.
नियोजनानुसार ट्रम्प आणि पुतीन यांच्यात सकाळी १० वाजता फोनवरून चर्चा होणे अपेक्षित होते. ही चर्चा झाल्यानंतरच त्याबद्दलचासविस्तर तपशील दिला जाईल, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लिवेट यांनी सांगितले होते.
ही चर्चा महत्वाची आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात इस्तंबुलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्वभुमीवर ही चर्चा निस्चितच महत्वाची असल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेश्कोव्ह यांनी देखील म्हटले होते. चर्चेमध्ये खरे तर केवळ युद्धकैद्यांच्या आदला बदलीच्या मुद्द्यावर एकमत झाले होते. अन्य कोणत्याही विषयावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होऊ शकले नव्हते.
ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्याला यश येत नसल्यामुळे हा मुद्दा आता त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. रशियाने युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध घालण्याचा इशाराही दिला आहे.
युद्धबंदीसाठी अमेरिकेच्या पुढाकाराने जो करार होईल, त्यात युक्रेनचा निश्चितच तोटा असेल. असे वाटल्यामुळे युक्रेनमधील अमेरिकेच्या राजदूत ब्रिगेट ब्रिंक यांनी गेल्या महिन्यातच राजीनामा दिला आहे.
आपली चर्चा रक्तपात थांबवण्यावर केंद्रित असेल. मात्र त्यात व्यापार, वित्तीय सवलतींचाही समावेश असेल, असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र युरोपातल्या नेत्यांनी त्यांच्या या प्रयत्नांना विरोध केल्यामुळे आता ट्रम्प या प्रयत्नांना काटाळले आहेत, असे जे.डी.वान्स यांनी सांगितले.





