Putin-Shehbaz Meeting | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे अमेरिकेसह सर्व जगाचे लक्ष लागले होते. यानंतर आता व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा अपमान करण्यात आला आहे. शहबाज शरीफ पुतिन यांची भेट घेण्याच्या प्रतीक्षेत ४० मिनिटे बसून राहिले, तरीही पुतिन भेटायला आले नाहीत, शेवटी ते निघून गेले. त्यानंतर शहबाज संतापलेल्या चेहऱ्याने पुतिन आणि तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोआन यांच्या बैठकीत जबरदस्ती शिरले, पण तिथेही कोणाने त्यांना भाव दिला नाही. काय आहे प्रकरण? तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबादमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, या परिषदेमध्ये जगभरातील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे देखील सहभागी झाले आहेत. या दरम्यान अनेक देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठका देखील केल्या, याचाच एक भाग म्हणून पुतिन आणि शरीफ यांची द्विपक्षीय बैठक होणार होती. या बैठकीसाठी शहबाज शरीफ आपल्या ठरलेल्या वेळेत बैठकीच्या ठिकाणी पोहोचले, ते जवळपास 40 मिनिटं त्या ठिकाणी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची वाट पाहात थांबले, मात्र पुतिन यांनी शरीफ यांची भेट घेतलीच नाही आणि शरीफ हे बैठकीच्या नियोजित स्थळावरून बाहेर पडले, यावेळी त्यांचा चेहरा उतरलेला दिसत होता. कारण या बैठकीमध्ये शरीफ हे पुतिन यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार होते. Putin-Shehbaz Meeting | दुसरी खुर्ची रिकामीच आरटीने जारी केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट दिसते की, पुतिन यांच्या प्रतीक्षेत शहबाज शरीफ अस्वस्थ झाले होते. मीटिंग हॉलमध्ये दोन खुर्च्या होत्या. मागे पाकिस्तान आणि रशियाचे झेंडे लावलेले होते. एका खुर्चीवर शहबाज शरीफ बसले होते, दुसरी खुर्ची रिकामी होती. व्हिडिओतून स्पष्ट दिसते की तोंडावर बोट ठेवून शहबाज पुतिन यांच्या येण्याची वाट पाहत होते, पण पुतिन आलेच नाहीत. दुसऱ्या व्हिडिओत दिसते की, शहबाज वेगाने चालत शेजारच्या खोलीत शिरले. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्या खोलीत पुतिन आणि एर्दोआन यांच्यात बैठक सुरू होती. शहबाज यांना पाहूनही पुतिन यांनी त्यांना काही भाव दिला नाही. शहबाज तिथेही प्रतीक्षा करत राहिले. आरटीच्या मते, जेव्हा असेच १० मिनिटे उलटली तेव्हा शरीफ तिथूनही न भेटता बाहेर निघून आले. Putin-Shehbaz Meeting | मोदींसोबत एकाच गाडीत प्रवास, पण शहबाज यांना केलं अपमानित दरम्यान, ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा पुतिन यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी प्रोटोकॉल तोडून स्वतः विमानतळावर पोहचले होते. तिथून दोघे एकाच गाडीत बसून पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. एकीकडे पुतिन यांचा भारत दौरा चर्चेत असताना दुसरीकडे त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेटही घेतली नाही, यामुळे पाकिस्तानला पुतीन यांनी चांगलेच फटकारलेले दिसते. हेही वाचा: पुणे विमानतळावर हायवोल्टेज ड्रामा! ८० फुटांच्या बोगद्यात बिबट्याला कसं पकडलं? वाचा