Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई

ICC Fakhar Zaman fined 10% match fee : पाकिस्तान संघाने नुकतीच आपल्या मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयात पाकिस्तानने अष्टपैलू कामगिरी केली होती. मात्र, आता या सामन्यातील एका चुकीमुळे पाकिस्तानचा फलंदाज फखर झमानवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला असून, त्याच्या खात्यात डिमेरिट पॉईंट देखील जोडला गेला आहे.
फखर झमानकडून नियम २.८ चे उल्लंघन –
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात, पाकिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करत होता. श्रीलंकेच्या डावातील १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फखर झमानने दसुन शनाकाचा एक झेल टिपला. मैदानी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. रिप्लेमध्ये, झेल घेताना चेंडू जमिनीला लागल्याचे दिसले, त्यामुळे शनाकाला ‘नॉट आऊट’ देण्यात आले.
Fakhar Zaman has been fined 10 per cent of his match fee for a Level 1 breach of the ICC Code of Conduct during the recent Tri-Series final against Sri Lanka.#FakharZaman pic.twitter.com/MWtI1PKoj0
— Fourth Umpire (@UmpireFourth) December 5, 2025
या निर्णयावर फखर झमानने मैदानी पंचांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्याच षटकाच्या पुढील चेंडूवर शनाका बाद झाल्यानंतर, फखरने तिसऱ्या पंचांच्या दिशेने दोन्ही हात वर करून अपील करण्याची कृती करत पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली. फखर झमानच्या या वागणुकीची गंभीर दखल आयसीसीने घेतली आहे.
हेही वाचा – Shai Hope Century : डोळ्यांना संसर्ग असतानाही गॉगल लावून शतक; शाई होपने साकारली जिगरबाज खेळी
मॅच फी मध्ये १०% कपात आणि डिमेरिट पॉईंट –
आयसीसीने फखर झमानवर आचारसंहितेच्या नियम २.८ च्या लेव्हल-१ चे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई केली आहे. यानुसार, त्याच्या मॅच फी मध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जोडला गेला आहे. गेल्या २४ महिन्यांमध्ये त्याच्यावर आयसीसीने केलेली ही पहिली कारवाई आहे. फखर झमानने आयसीसीने दिलेली ही शिक्षा स्वीकारली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात कोणतीही औपचारिक सुनावणी होणार नाही.





