Russia struck Ukraine : रशियाकडून युक्रेनच्या नागरी भागात पुन्हा जोरदार हल्ले !
रशिया ३ हजार पौंडांचे ग्लाईड बॉम्ब, तोफखाना, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा निरपराध लाकांवर मारा करत असून नंतर पायदळाचा हल्ला करत आहे.

Russia struck Ukraine – रशियाच्या विमानांनी युक्रेनच्या नागरी भागांमध्ये डागलेल्या ड्रोनमुळे २९ वर्षांची महिला आणि तिच्या ९ वर्षाच्या मुलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. रशियाकडून युद्ध सुरू झाल्यापासून या वर्षाच्या जुलै महिन्यात युक्रेनमध्ये सर्वाधिक भीषण हल्ले करण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्राने कालच म्हटले होते.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी युक्रेनच्या उत्तर भागात रशियाने हा हल्ला केला. गेल्या महिन्याभरात रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ४३७ जण ठार झाले आणि २,६१० जण जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षक दूतावासाने म्हटले आहे.
रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनविरोधातील युद्ध सुरू केल्यापासून १६,८७४ जण ठार झाले आहेत. त्यात ८२० लहान मुलांचाही समावेश आहे. तर ३,१२६ लहान मुलांसह ५१,२७३ जण जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क विषयक निरीक्षकांनी म्हटले आहे.
वर्षाच्या प्रत्येक महिन्याला मृत आणि जखमींचा आकडा वाढला आहे. जुलै महिन्यात ही आकडेवारी लक्षणीयरितीने वाढली, असे निरीक्षकांनी म्हटले आहे.
शुक्रवारी रशियाने युक्रेनच्या उत्तरेकडील सुमी भागात केलेल्या हल्ल्यामध्ये चार जण ठार झाले. ठार झालेल्या मुलाचे वडील आणि आजोबा गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेस्त्क भागात रशियाच्या ग्लाईड बॉम्बमुळे १० मजली अपार्टमेंटचे ६ मजले कोसळले आहेत. त्यात एक ठार झाला आणि १६ जखमी झाले, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले.
रशिया ३ हजार पौंडांचे ग्लाईड बॉम्ब, तोफखाना, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा निरपराध लाकांवर मारा करत असून नंतर पायदळाचा हल्ला करत आहे. यामुळे अनेक शहरे आणि गावे ओस पडत चालली आहेत. रात्रीभरात रशियाने युक्रेनच्या १२ क्षेत्रांवर असे हल्ले केले आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले.





