Russia earthquake : रशियाच्या बेटांना भूकंपाचा जोरदार धक्का ! लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

Russia earthquake – रशियाच्या पूर्व किनारपट्टीजवळच्या किनारपट्टीला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर रशियाच्या कुरिल बेटे आणि जपानच्या उत्तरेकडील होक्काइदो बेटांना त्सुनामी लाटांचा जोरदार तडाखा बसला. याशिवाय अलास्का, हवाई आणि अन्य दक्षिणेकडील न्यूझीलंडपर्यंतच्या किनाऱ्यांना त्सुनामी लाटांचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता ८.८ मॅग्निट्युड इतकी होती.
जपानच्या दक्षिणेला जवळपास ६० सेंटिमीटर (२ फूट) उंचीच्या लाटा उसळल्याचे जपानच्या हवामानशास्त्र संस्थेने म्हटले आहे. होक्काइदो पासून टोकियो बे पर्यंतच्या किनारपट्टीजवळ या मोठ्या लाटा उसळत होत्या. यापेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू कामचातका द्विपसमूहाजवळ होता. त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जाऊ लागले होते. तर जपानमध्ये बुधवारी दुपारपर्यंत पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्याजवळच्या २२० महापालिकांच्या हद्दीतल्या तब्बल २ दशलक्ष लोकांना तातडीने दुसरीकडे हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जपानच्या उत्तरेकडील होक्काइदो बेटावरील एक ज्येष्ठ महिला धावपळीमध्ये पडल्याने जखमी झाली आहे. या महिलेला नंतर रुग्णालयात नेण्यात आले.
कॅलिफोर्निया शहरात आणि नॉर्दर्न कॅलिफोर्नियामधील क्रेसेन्ट या छोट्या शहरात देखील त्सुनामी लाटा येण्याचा इशारा देणारे सायरन वाजवले गेले. नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांपासून दूर रहावे. ११.५५ वाजता त्सुनामी येण्याची शक्यता आहे. सुरक्षित ठिकाणी जाण्याबाबतच्या सूचनांकडे लक्ष देण्यात यावे, असे फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले गेले होते. अलास्का शहराला यापूर्वी १९६४ मध्ये त्सुनामी लाटांचा तडाखा बसला होता. तब्बल २१ फूट उंचीच्या लाटा उसळल्यामुले ११ जण ठार झाले होते आणि मोठे नुकसान देखील झाले होते.
जपानमधील होनोलूलू भागातल्या गॅस स्टेशनवरील कर्मचारी सुखरुप घरी परत जाता यावे म्हणून लवकर निघून गेले. त्यामुळे या गॅस स्टेशनबाहेर लोकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दीर्घकाळ घरातच रहावे लागेल या विचाराने लोकांनी पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ जमा करून ठेवले.
जमिनी लगतच्या रहिवाशांनी उंचीवरच्या ठिकाणी स्थलांतर केले. होक्काइदो बंटावरच्या हमानाका आणि कुजी बंदरांजवळही २ फूट उंचीच्या लाटा उसळल्या. ‘कियो बे जवळ दिड फूट उंचीच्या लाटा उसळल्या. आणखी दोन किंवा तीन वेळा अशाच लाटा येण्याचा इशाराही दिला गेला होता.
चीनच्या शांघाय आणि झेजियांग प्रांतांच्या पूर्व किनाऱ्यांनाही १ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटांचा इशारा देण्यात आला होता. कोमे वादळ या प्रांतांना आजच धडकण्याची शक्यता असल्याने या प्रांतांना यापुर्वीच सतर्कतेचाइशारा दिला गेला आहे. ब्रिटिश कोलंबियातील व्हँकुव्हर बेटाच्या काही भागांना त्सुनामीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मेक्सिकोच्या नौदलाने पॅसिफिक किनाऱ्याला त्सुनामीच्या लाटांचा इशारा दिला आहे.
अलास्का, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियामध्ये १ फूट ते ५ फुटांपर्यंतचच्या लाटा उसळल्या होत्या. काही ठिकाणी यापेक्षाही जास्त उंचीच्या लाटा आल्याचे बघितले गेले. मात्र ठिकठिकाणी उसळलेल्या त्सुनामी लाटांमुळे कोठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे अलास्कामधील नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे. त्सुनामी लाटांचा प्रभाव दिवसभर राहण्याची शक्यताही सेंटरने वर्तवली आहे.
त्सुनामी लाट एकदाच येत नाही.
समुद्रात झालेल्या भूकंपामुळे त्सुनामी येते. पण एका लाटेत हा प्रभाव कधीच कमी होत नाही. एकापेक्षा जास्त लाटा येण्याची शक्यता असते. थोड्या थोड्या वेळाने या लाटा येण्याची शक्यता असते. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ निर्माण झालेल्या या लाटा किनाऱ्याजवळ येत असताना खूप मोठ्या असतात.
मात्र किनाऱ्याला धडकताना त्या खूप संथ झालेल्या असतात. किनाऱ्याजवळ त्या उसळत असतात. त्यामुळे या ठिकाणी अचानक पूर येऊ शकतो, असे अलास्कामधील नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने लोकांना त्सुनामीच्या लाटा बघण्यासाठी किनाऱ्यावर जाऊ नये असा इशारा दिला आहे.





