AB फॅार्म मिळवण्यासाठी धावाधाव… तिकडे ठाण्यात शिंदेंच्या खासदाराला मोठा धक्का! शेवटच्या क्षणी…

Thane Municipal Corporation Election : आज राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, अनेकांना उमेदवारी न देण्यात आल्याने नाराजीची लाट पसरली आहे. ठाण्यात देखील चित्र वेगळे नाही. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले खासदार नरेश म्हस्के यांना एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे.
शिवसेनेकडून अगदी शेवटच्या क्षणी नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांचे तिकीट कापले आहे. यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे. पक्षाकडून एबी फॅार्मचे वाटप सुरू झाले असून फॅार्म मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून धावधाव केली जात आहे. पण शिवसेनेचे खासदार असलेले नरेश म्हस्के यांचे पुत्र आशितोष यांचे तिकीट क्षेवटच्या क्षणी कापल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आशितोष म्हस्के हे ठाणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जाते. पण अखेरच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने म्हस्के पिता पुत्रांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आशितोष यांना तिकिट मिळवण्यासाठी नरेश म्हस्के यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. खासदाराच्या मुलाचे तिकीट कापल्याची चर्चा ठाण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवसेनेत नाराजी
राज्यातील अनेक ठिकाणी पक्षाकडून एबी फॅार्म मिळविण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपत आली असून, इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या सगळ्यात बंडोखोरी देखील होताना दिसत आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण नाराज झाले असून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नाराजांची समजूत काढण्यासाठी ठाण्यात दाखल झाले आहेत. ठाण्यातून अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्याने मोठी अस्वस्थता शिवसेनेत पसरली आहे.





