Ruplekhatai Dhore : मावळच्या राजकारणातील ‘रणरागिणी’ हरपली! प्रथम महिला आमदार रुपलेखाताई ढोरे यांचे निधन
Ruplekhatai Dhore : १९९५ मध्ये दिग्गज नेत्यांना धूळ चारीत विधानसभेत एन्ट्री; मावळच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान.

Ruplekhatai Dhore – मावळ तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा खंडेराव (दादासाहेब) ढोरे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळच्या सार्वजनिक जीवनातील एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपले असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.मावळ तालुक्यातील महिलांसाठी राजकारणाचे दार उघडणाऱ्या रुपलेखाताईंनी आपल्या कार्यकाळात ठामपणा, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करत वेगळा ठसा उमटवला होता.
त्यांच्या जाण्याने केवळ एक माजी आमदारच नव्हे, तर मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या भारतीय जनता किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज ढोरे आणि उद्योजक सचिन ढोरे यांच्या मातोश्री होत. तसेच वडगावचे माजी सरपंच बाळासाहेब ढोरे यांच्या त्या चुलत्या होत.
गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. मात्र त्यांच्या कार्याचा ठसा मावळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आजही स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या निधनानंतर मावळ तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
मावळच्या राजकारणात महिलांसाठी वाट उघडणाऱ्या नेत्या हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. रुपलेखा ढोरे यांनी घालून दिलेली विकासाची दिशा आणि सार्वजनिक जीवनातील शिस्तबद्ध कार्यपद्धती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
राजकीय प्रवास – पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत
रुपलेखाताईंचा राजकीय प्रवास पंचायत समितीपासून सुरू झाला. १९९३ ते १९९५ या काळात त्यांनी मावळ पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून जबाबदारी पार पाडली. या काळात त्यांनी ग्रामीण विकास, महिला प्रश्न आणि स्थानिक प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली. १९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी माजी मंत्री मदन बाफना यांचा पराभव करून इतिहास घडवला आणि मावळच्या पहिल्या महिला आमदार म्हणून त्या विधानसभेत पोहोचल्या.
मावळच्या विकासाला गती
आमदार म्हणून कार्यरत असताना रुपलेखाताईंनी रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य सुविधा आणि ग्रामविकास या क्षेत्रांत अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली. मावळ तालुक्यातील पुढील २५ वर्षांच्या भाजप राजवटीचा पाया त्यांच्या कार्यकाळातच रचला गेला, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यांचा कारभार शांत, संयमी आणि विकासाभिमुख होता. प्रसिद्धीपेक्षा कामाला प्राधान्य देणाऱ्या नेत्या म्हणून त्या ओळखल्या जात असत.
शैक्षणिक क्षेत्रातही योगदान
राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. पुढे संस्थेच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, हा त्यांचा कायम आग्रह होता.





