प्रभात वृत्तसेवा तळेगाव दाभाडे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित कै. अँड. कु. शलाका संतोष खांडगे विधि महाविद्यालयाचे उद्घाटन सोमवारी (दि. ६) होणार आहे. हा समारंभ एनआयईटी विंग २, मावळ भूषण कृष्णराव भेगडे शिक्षण संकुल, विष्णुपुरी येथे पार पडणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली. या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे स्वीकारणार आहेत.कार्यक्रमाला अभिनव संचनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक अशोककुमार भिलारे, प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत. बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष राजेंद्र उपाम, विद्यापीठाचे मानव्य विद्या शाखेचे डिन डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.विधीशास्त्र दालनामुळे स्थानिक तरुणांना कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव संतोष खांडगे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.