रूपगंध: तेन त्यक्तेन भुंजीथा: ओशोवाणी

– ओम
एका शिष्यानं विचारलं – ‘बुद्ध सांगतात कमीत कमी गरजा ठेवा. त्यावर जगा. तुम्ही सांगता कंजूषीनं कसंबसं जगू नका. भरपूर भोगा. तुमच्या दोघांत आम्ही समन्वय कसा साधायचा?’
ओशो उत्तरले – ‘समन्वय साधायला कोण सांगतंय? बुद्धांचं योग्य वाटलं ते ऐका. माझं योग्य वाटलं तर तसं करा. पण ताळमेळ, समन्वय वगैरे करू नका. तुम्हाला औषध घ्यायचंय ना? मग अॅलोपॅथी किंवा आयुर्वेद- काहीतरी एकच घ्या. दोन्ही एकदम घ्याल तर भलतंच घडू शकतं.’
बुद्ध म्हणतात- गरजा कमीत कमी असू दे. हे झालं एक टोक. उडी तर टोकावरूनच मारता येते ना? तुम्ही काही मध्ये राहून उडी नाही मारू शकत. टोक गाठा. कमी गरजा करा किंवा मी सांगतो ते टोक भोगाचं! पण जा कुठंतरी टोकालाच. तुम्ही जर बुद्धाचं ऐकून अर्ध सोडलंत आणि माझं सांगणं मानून अर्ध भोगलंत तर अर्धवट राहाल. बुद्ध परिपूर्ण आहेत. त्यांच्या सांगण्यात माझं जोडू नका. दुनियेतले सगळे धर्म आपापले परिपूर्ण आहेत.
मी सगळ्या धर्मांची एकत्र गाठोडी वळू शकत नाही. मी कधी बुद्धांवर, कधी पैगंबरांवर, कधी कृष्णावर, कधी येशूवर, कधी महावीरांवर असा बोलतो. पण कृपा करून तुम्ही सगळे एकत्र नका करू. कोणाला हिंदू धर्म पटेल, कोणाला मुस्लीम, कोणाला बौद्ध, कोणाला जैन. एक लक्षात ठेवा आपल्याला पिकलेले, गोड, रसाळ आंबे हवे आहेत. मग आठळ्या कशाला मोजत बसता?
तसंच तुम्हाला बुद्धांची वाट आवडत असेल तर मला पूर्णपणे सोडून द्या. माझ्याशी काही देणंघेणं ठेवू नका. त्याच मार्गानं जा. तो रस्ता पूर्ण झाल्यावर तुम्हाला सत्याबद्दल कळेल. त्यात काहीच मिसळू नका. मनाचा हा खूप मोठा अवघड त्रास आहे की ते कधीच एका दिशेला समर्पित होत नाही. एक पाऊल डावीकडे, एक पाऊल उजवीकडे, एक पाऊल पुढे, पुन्हा दुसरं मागे. शेवटी आयुष्य संपून जाईल आणि तुम्ही तिथंच राहाल. पश्चिम ठरवली तर तिकडंच जा. इतर दिशा आहेत हेच विसरा. इतर लोक भलेही तिकडे जात असतील, पण तुम्ही नका जाऊ.
प्रत्येक मनाची आवड वेगळी असते. मीरेला इतर देवांमध्ये रसच नाही वाटणार. कारण नाच आणि गाणं हेच तिच्या रोमारोमात आहे. कृष्णाच्या बासरीत आणि रासमध्येच तिचं सार्थक आहे. ज्याला मौन आणि स्थिरता हव्यीय त्यानं बुद्धांकडे जावं. काहीजण अक्कल पाजळतात की गुरू एकच असतात. फार मोठी गोष्ट छोट्या अवस्थेत बोलू नका. ते तर मला समजू शकत नाहीत, ना इतर कुणाला. गुरू एक असतात ते शिखरावर गेल्यानंतर- वाटेत चालताना नाही. कृष्णाचं बासरीवादन पोचवतं तसं बुद्धाचं मौनही पोचवतं. चुकूनही स्वतःला शिखरावर असल्याचं समजू नका- जिथं तुम्ही नाहीयात. तसं समजून काही मिळणार नाही.
शिखरावर तर सगळे धर्म, सगळे गुरू, सगळी शास्त्रं विलीन होऊन जातात. पण ते सोडून द्या- ती मिळाल्यानंतरची गोष्ट आहे. मी सांगतो भोग घ्या. पैसा, खाणं, उंची वस्त्रं, उंच महाल, राजवाडे. त्यात काही अर्थ नाही हे तुम्हाला भोगल्यानंतरच कळेल. बुद्धांना कळलं कारण त्यांना पैसा, वस्त्रं, स्त्रिया, खाणं सगळं उपलब्ध होतं. त्यांचं सुटून गेलं. भोगाला अर्थ नाही हे त्यांना एका क्षणी कळलं तेव्हां भोग सुटून गेले. सुटून जाण्याला किंमत आहे. मुद्दाम सोडण्याला काही अर्थ नाही. त्यानं मनात आसक्ती राहतेच. म्हणूनच मी म्हणतो- इतकं भोगा की नंतर त्याचा कंटाळा येऊन ते सुटून जाईल. त्याग घडेल, करावा नाही लागणार. तेन त्यक्तेन भुंजीथा:। जो भोगेल त्याच्याकडूनच त्याग आपोआप घडेल.





