रूपगंध : पत्र नव्हे मित्र

काय रे मधुकर, सकाळीच कसली शोधाशोध सुरू आहे तुझी?’ मधुकरचा मोठा भाऊ सतीशने त्याला हटकले. मधुकर म्हणाला, “दादा सापडलं की सांगतो.’
“अरे हो रे बाबा, शोधलं की सापडतं ते मलाही माहितीय. पण तू असं नक्की काय शोधतोयस? जे सापडत नाही म्हणून इतका हवालदिल झालायस.’ मधुकर काहीसा नाराजीनेच म्हणाला, “दादा, आजचं वर्तमानपत्र शोधतोय मी.’
दादा एकदम उडालाच. “काय? आज चक्क वर्तमानपत्र वाचायची हुक्की आलीय होय आमच्या बृहस्पतीला. एरवी मी सारखा कानीकपाळी ओरडत असतो तुझ्या की, रोजचं वर्तमानपत्र रोज वाचावं म्हणून, पण ऐकशील तर शप्पथ! माझं बोलणं कानामागे टाकून चकाट्या पिटायला लगेच पळतोस घराबाहेर. मग आज कशी काय त्या बापड्या वर्तमानपत्राची आठवण झाली तुला? हा… “क्रीडा’ पान वाचायचं असेल आज. क्रिकेटमधील “सचिन’च समजतोय ना तू स्वतःला.’
मधुकर लगेच म्हणाला, “तसं काही नाही रे दादा, आज आमच्या शाळेचं नाव आजच्या पेपरमध्ये झळकणार आहे ना! आमच्या शाळेतल्या गटाने राज्यस्तरावर सादर केलेल्या “पाऊस मोजणी यंत्राला’ विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात पहिला नंबर मिळालाय!’
दादाने शंका विचारलीच. “हो का? पण काय रे, तुला कसं काय माहीत आज पेपरमध्ये तुमच्या शाळेचं नाव येणाराय ते? कुठली सिद्धी वगैरे प्राप्त केलीस की काय तू… न पाहता एखादी गोष्ट ओळखायला.’
मधुकर हसूनच म्हणाला, ‘अरे, काल पत्रकार शाळेत आले होते ना, म्हणून कळलं. विज्ञान प्रतिकृतीबद्दल आमच्या गटाची चक्क मुलाखतसुद्धा घेतली त्यांनी?’ दादा आनंदाने म्हणाला, “मज्जाच आहे बुवा एका मुलाची. व्वा… व्वा!… पण काय रे, काल घरात एक चकार शब्द याबद्दल काढला नाहीस. मी तर, काल तुला शाळेतून घरी यायला उशीर का झाला असं खोदून खोदून विचारलं तर दातखिळी बसल्यासारखा गप्पच बसून राहिलास. जणू तोंडाला कुलूप आणि आज बरं सकाळीच पेपर शोधत बसलायस. हा… घरादाराला दाखवायची असेल आपली कर्तबगारी पेपरात छापून आलीय ती.’
मधुकर म्हणाला, “दादा, अरे तुम्हा सर्वांना आनंदाचा सुखद धक्का द्यायचा होता मला.’ “अरे पण मधू, निदान मला तरी तू काल खासगीत सांगायचंस ना. मी थोडीच त्या बातमीची दवंडी पिटवत बसलो असतो. अरे मी तर तुझा मोठा भाऊ. तोंडभरून मला दादा म्हणतोस. मग मला सांगायला काय धाड भरली तुला?’
मधुकर म्हणाला, “दादा किती रे बोलशील लहान भावाला!’ दादा म्हणाला, “अरे पण मी बोलतो ते तुझ्या भल्यासाठीच ना. पण ते कळतंय कुठं तुला. नियमित वर्तमानपत्र माझ्यासारखं वाचत जा, असं सारखं सांगत आलो तुला. माझ्या बोलण्याकडे तू नेहमीच कानाडोळा करत आलास. पण तुला एक गोष्ट सांगू मधू… माझा नेहमी भाषणात, वादविवाद स्पर्धेत, प्रश्नमंजुषेत अव्वल क्रमांक का येतोय ते, तुला ठाऊक आहे? अरे माझ्या वर्तमानपत्र वाचनाच्या वेडामुळे…
अरे, वर्तमानपत्र हेसुद्धा ज्ञानाचं एक भांडारच आहे बरं. वर्तमानपत्रातून आपल्याला बहुविध प्रकारची माहिती मिळते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, विज्ञान यातील दैनंदिन घडामोडी कळतात. अरे मधू, वर्तमानपत्र म्हणजे खराखुरा मित्रच. कुणीतरी म्हटलंय… आनंदात दुःखात, संकटात प्रत्येक वेळी आपल्याला सोबत करतो तोच खरा मित्र’ आणि मधू आजची वर्तमानपत्रं हे मित्राचेच काम करतात, मदतीचे अनेक हात होऊन.’ मधुकरला दादाचं म्हणणं पटलं.
दादा पुढे म्हणाला, “मधू आजची वर्तमानपत्रं जरी उद्या रद्दी होतात. तरी पण लक्षात ठेव, अल्पायुष्यातील वर्तमानपत्राची कामगिरी मात्र चांगलीच लक्षणीय असते. जनजागृतीचे महत्त्वाचे कार्य वर्तमानपत्र पार पाडीत असतात.’ मधुकर म्हणाला, “नाही रे दादा, आज तर तू माझे डोळे उघडलेस!’ मधुकरने पेपर हातात घेऊन आधी पान सातवरील शैक्षणिक सदरातील त्यांच्या शाळेची बातमी शोधून काढली. पेपरात छापून आलेला त्यांच्या गटाचा फोटो त्याने दादाला दाखवला. फोटो पाहून दादा म्हणाला, “अरे वा! फोटोही छानच आलाय तुमच्या गटाचा! मधू, तुला मी एक प्रश्न विचारू? देशील उत्तर तू?
जगात कुठेही, खुट्ट जरी वाजले
दुसऱ्या दिवशी त्याने, अचूक सांगितले
सकाळच्या चहासोबत, येऊन पडते हातात
ज्ञान, रंजनाचे कामही, कोण बरं करतात?
मधुकर पटकन म्हणाला, “वर्तमानपत्र’. हो ना? दादा म्हणाला, “होय, अगदी बरोब्बर!’ मधुकर म्हणाला, “दादा आज फक्त मी माझी बातमी नाही वाचणार. तर आजपासून अख्खा पेपरच वाचण्याचा संकल्प केलाय मी.’
एकनाथ आव्हाड




