Pune Crime: मित्रच ठरला गद्दार! स्टील व्यावसायिकाची 40 लाखांची लूट; 24 तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश

पुणे, – धाराशिवमधील एका स्टिल व्यावसायिकाची ४० लाखांची रोकड हिसकावलेल्या गुन्ह्याचा आंबेगाव पोलीस आणि गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत छडा लावला. याप्रकरणी, दोघांना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षीत मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पैशांच्या मोहातून व्यवसायिकाच्या बाल मित्रानेच कट रचून ही रोकड लुटल्याचे समोर आले आहे. त्यासाठी व्यवसायिकाच्या गावापासून थेट पुण्यापर्यंत पाठलाग करण्यात आला होता.
प्रदिप रामदास डोईफोडे (रा. इंगळेनगर, भुगाव), मंगेश दिपील ढोणे (रा. हडपसर, मुळ. येडशी, धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजित विष्णू पवार (वय ३२, रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
आंबेगावमधील बाबजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर मंगळवारी (दि.१६) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. व्यवसायिक पवार आणि ढोणे हे दोघे बाल मित्र आहेत. ढोणे याला पवार यांच्या आर्थिक उलाढालीबाबत माहिती होती. पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांना पुरविलेल्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी पवार बुधवारी रात्री पुण्याला निघणार असल्याचे ढोणेला माहिती होते. ढोणे याला पैशांची लालसा झाली. ढोणे आणि इतर तिघांनी रोकड लुटण्याची योजना आखली.
डोईफोडे याने त्याचीच थार गाडी गुन्हा करण्यासाठी वापरली. रोकड हिसकावल्यानंतर आरोपींनी खेड, पाटस, जामखेड मार्गे धाराशिव जिल्हा गाठला. रोकड हिसकावताना डोईफोडे याच्यासोबत आणखी दोघे होते. पवार गावातून निघाल्यापासून त्यांच्या ट्रॅव्हल्सचा पाठलाग करण्यात आला. पवार यांच्या ओळखीच्या विधीसंघर्षीत मुलाने याबाबतची टिप ढोणेला दिली. त्यानंतर ढोणे याने इतर दोघा आरोपींच्या संपर्कात राहून डोईफोडे मार्फत ही लुट केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून ९ लाख ३५ हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली थारगाडी, पाच मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश
पोलिसांनी तपास करताना, चोरट्यांनी पवार यांना मारहाण केली. परंतु, ढोणे याला हात देखील लावला नाही, हे अचूक हेरले. दुसरीकडे तांत्रिक तपासात ढोणे हा धाराशिव येथील इतर तिघा व्यक्तींच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले. शेवटी पोलिसांनी त्याला खाक्या दाखवतचा त्याने इतर साथीदारांच्या मदतीने आपणच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते, निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, शरद झिने, गजानन चोरमले, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, अशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, कर्मचारी गणेश दुधाने, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार, सचिन गाडे, प्रदिप भोसले यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे. इतर काही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
– शरद झिने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस ठाणे





