Donald Trump : “जोपर्यंत मी व्हाईट हाऊसमध्ये आहे, तोपर्यंत अमेरिकेत भारताला एक मित्र मिळाला आहे” – डोनाल्ड ट्रम्प
जवळपास दिड वर्षांनंतर दोन्ही नेत्यांची भेट होत असल्याने आणि अलिकडच्या काळातील ताणतणावाच्या पार्श्वभुमीवर दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.

Donald Trump – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज जी-७ परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चर्चा झाली. जवळपास दिड वर्षांनंतर दोन्ही नेत्यांची भेट होत असल्याने आणि अलिकडच्या काळातील ताणतणावाच्या पार्श्वभुमीवर दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते.
पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची आशा पुन्हा जागृत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना धन्यवाद दिले. पंतप्रधान मोदींनी खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. इराणसोबतच्या शांतता करारात खलाशांच्या सुरक्षेसाठी तरतुदी असतील अशी आशा व्यक्त केली.
लाखो भारतीय खलाशी सागरी क्षेत्रात कार्यरत आहेत; मला वाटते की त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तर पश्चिम आशियासह प्रमुख मुद्द्यांवर भारत मोठी भूमिका बजावतो आहे. रोजगाराच्या बाबतीत भारतासोबत आमचे संबंध नेहमीच उत्कृष्ट राहिले आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
पंतप्रधान मोदींबरोबरची ही बैठक खूप चांगली होती. जोपर्यंत मी व्हाईट हाऊसमध्ये आहे, तोपर्यंत अमेरिकेत भारताला एक मित्र मिळाला आहे, असे पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प म्हणाले.





