बॅगेत पुस्तकं नव्हे, तर चाकू! किरकोळ वादानं रंगला रक्तरंजित शेवट; घेतला मित्राचा बळी
Ahmedabad – गुजरातच्या अहमदाबादमधील एका शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर चाकूने करण्यात आलेल्या हल्ल्यात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेबाहेर गोंधळ घातला.
अहमदाबादमधील सेव्हन्थ डे स्कूलमधील ही घटना घडली. दोन विद्यार्थ्यांचे किरकोळ कारणावरून भांडण केले. त्यामुळे एक विद्यार्थी संतापला आणि त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार केले आणि त्याचा मृत्यू झाला.
काल म्हणजे १९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दहावीचा विद्यार्थी त्याच्या चुलत भावासोबत सेव्हन्थ डे स्कूलमध्ये शिकत होता. सुट्टीनंतर दोघेही पायऱ्यांवरून खाली येत असताना त्याचे दुसऱ्या विद्यार्थ्याशी भांडण झाले. भांडण इतके वाढले की ते हाणामारीपर्यंत पोहोचले.
यादरम्यान, आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या बॅगेतून चाकू काढला आणि समोरच्या मुलावर हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. चाकू लागल्याने विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी शाळेवर हल्लाबोल केला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. मृत विद्यार्थ्याच्या आईने खोखरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बालगुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी विद्यार्थ्यालाही ताब्यात घेतले आहे.





