रूपगंध: आपणच आपल्या दुःखाचे कारक

माणसाची मानसिकता बदलली आणि माणसातील माणूस बदलत गेला. माणसाच्या केंद्रस्थानी पैसा हा महत्त्वाचे केंद्र बनला तसा माणूस त्यामागे अक्षरशः धावत सुटला, त्याशिवाय त्याला पर्यायही नव्हता. त्याला कारण दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जगण्याचा उंचावलेला स्तर, लाखोच्या घरात मुलांची शाळा, कॉलेजची फी, वाढत्या गरजा, मनात असलेल्या भरपूर अपेक्षा, त्यांना पूर्ण करण्यासाठी बघितलेली स्वप्ने! एक नाही तर अनेक गोष्टीमध्ये माणूस गुंतून पडला आणि या सर्व गोष्टींच्या अवतीभोवती फिरणार्या विचाराने तो जगणे केव्हा विसरला त्याचे त्यालाच कळले नाही. या सर्व बाबींचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आणि आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या. सततच्या चिंतेने मनाचे स्वास्थ्य बिघडले आणि सुखाच्या शोधात दुःखाचे घर बांधणे चालू झाले.
पूर्वी माणसाकडे पुरेसा पैसा नव्हता; पण सुख होते. आता पैसा भरपूर आहे; पण सुख नाही, कारण माणूस अपेक्षांच्या आणि गरजांच्या ओझ्याखाली दबत चालला. या वाटचालीत तो स्वार्थी झाला कारण वाढत्या महागाईने त्याचे आर्थिक संतुलन बिघडले. गरजा जास्त असल्यामुळे त्या पूर्ण करण्यास त्याची मिळकत पुरेनाशी झाली आणि यातूनच स्वतःच्या कुटुंबाचे भरणं पोषण आणि चांगले जगणे एवढे प्राथमिक महत्त्व त्याला समजू लागले. घरात दोघांनी कमावल्या शिवाय पर्याय नाही, त्यामुळे दोघेही बाहेर पडले. जीवन व्यस्त झाले.
कुठे जाणे येणे उठणे बसणे सर्वच संपले. माणूस माणसापासून दुरावल्या गेला तो याच कारणाने. पूर्वी घरात पाहुणे येणार म्हटले की आनंदाची लहर यायची आता कपाळावर आठ्या येतात. घरात सोयी आहे. सुबत्ता आहे. कुणाला जेवू घालता येईल एवढी दानत आहे; पण वेळ नाही. या वेळेनेच संवादाची दारे बंद केली. मुले पूर्वी मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टी घालवल्या जायचे आता दोन दिवसही मुश्किल जाते; त्यामुळे एकमेकांच्या सहवासाने मनात जागवणार्या प्रेम भावना पोकळ झाल्या. ओलावा संपला की झाड सुकते त्याप्रमाणे नात्यातील झाड सुकायला लागले. भावनिक आधार संपले आणि आरोग्य समस्यांचे विकार वाढले.
खळखळून हसलं की आरोग्य चांगले राहते असे म्हटल्या जाते! मनमोकळे बोलले की मन प्रसन्न राहते असे म्हटल्या जाते; पण ज्यांच्या जवळ आपण आपले मन मोकळे बोलू शकतो ते आपुलकीचे माणसेच आपल्या अवतीभोवती राहली नाही किंवा आपण ती गमावली. माणसाचा माणसाशी आत्मिक दुरावा हीच एक घातक समस्या आहे. ही घातक समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली. माणसे जवळ तर आहे; पण आंतरिक ओढीने नाही तर व्यावहारिक आणि गरजेच्या नात्याने जवळ आहे. जिवापाड प्रेम करणारा सुदामा केव्हाच संपला. संकटातून वाचवणारा भाऊ केव्हाच हरवला. स्वतः अर्धी भाकर खाऊन आपल्या ताटातील अर्धी भाकर दुसर्याला देणारा दानशूर दिसेनासा झाला. माणुसकीला औपचारिक प्रकारचे लेबल लावून माणुसकी मिरवू लागली. सुखसोयीच्या गरजा वाढल्या तशी माणसाची गरज कमी झाली.
एकाकी आयुष्याला समस्या, वेदना, यातना जास्त भेडसावू लागल्या. यातूनच माणसाचे चिडचिडेपण वाढले. याचा परिणाम शरीरावर होऊ लागला. बीपी, शुगर सारख्या बिमार्या शरीरातील मुक्कामी पाहुण्या झाल्या. चिंताग्रस्त जीवनशैलीने आयुष्य कमी झाले. तंत्र आले यंत्र आले सर्व काही सोपे झाले; पण सुख, शांती आनंद या सर्व गोष्टी दूर होऊ लागल्या, अवतीभवती माणसांची गर्दी खूप आहे, तरीही जीव गुदमरतो. बदलती जीवनशैली याने जगण्यावर होणारे परिणाम शरीरावर होऊ लागल्याने जीवन मिळमिळे झाले. प्रत्येकाला नात्याचा ओलावा हवा असतो. प्रेम करणारी जीव लावणारी माणसे हवी असतात; पण आपण प्रथम कुणाच्या जीवनात आनंदाचा दीप व्हावा हेच नेमके माणूस विसरतो, त्याच कारणाने दुःख आयुष्याला चिकटून राहते.
जीवन सोपे करून जगणे आपल्याच हातात आहे. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रामाणिक वृत्ती, विवेकाचा विचार करणे, नीतीने चालणे, परिस्थिती कुठलीही असो समाधानी राहणे, या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या वागण्या बोलण्यात करण्या ऐवजी त्यावर आपण विश्लेषण आणि आलोचना करीत बसतो; यामुळे आपले मन नैराश्याने ग्रासल्या जाते. सुख-शांतीचे क्षण दूर पळतात. मन अस्वस्थ होते आणि जीवन होत कठीण जाते.
– निशा खापरे





