Rupali Patil Thombar : “रात्रीस खेळ चाले, निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा…”; रुपाली ठोंबरेंचा कुणावर निशाणा? पोस्ट चर्चेत

Rupali Patil Thombar Vs Rupali Chakankar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या जागेवरुन अंतर्गत वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. रखडलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यातच आता विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास विरोध केला जात आहे.
एकाच महिलेला किती पदे देणार? असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी निशाणा साधला होता. त्यांनी अनेकदा समोर येऊन यावर उघडपणे भाष्य केले आहे.
आता पुन्हा एकदा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. यात त्यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. पण हा रोख चाकणकरांवर असल्याचं दिसून येत आहे. सध्या अजित पवार गटात रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद रंगला आहे.
रुपाली पाटील-ठोंबरे यांची फेसबुक पोस्ट !
बाई काय हा प्रकार… किती वेळा तेच ते.. “रात्रीस खेळ चाले” ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं… पण छेss निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा… #दया_कुछ_तो_गडबड_है #दालमें_कुछ_काला_नही_पुरी_दालही_काली_है_भाई.





