Chauphula Art Center Shooting Incident : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्रात गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. सुरूवातीला केवळ कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे, अशी चर्चा सुरू होती, अखेर खरंच गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे. नेमक्या कोणत्या कलाकेंद्रात गोळीबार झाला याची माहिती देण्यात आली नव्हती, न्यू अंबिका नावाच्या कलाकेंद्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीचा वेग वाढवला आहे. अशातच आता या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींमध्ये भोरचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांविरोधात यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये कला केंद्रात गोळीबार करणारा बाळासाहेब मांडेकर हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोर-वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे. या प्रकरणामुळे आता आमदार शंकर मांडेकर अडचणीत येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शंकर मांडेकर हे बांधकाम आणि जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय करतात. त्यांच्या सख्ख्या भावाने दौंडमधील कला केंद्रात गोळीबार केल्याने आता ते चर्चेत आले आहेत. नेमकी घटना काय आहे? सोमवारी रात्री येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत एक तरूणी जखमी झाली होती. वादातून गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कला केंद्राचे मालक अशोक जाधव यांच्यासह 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. गोळीबाराचा घटनेमुळे दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार काय म्हणाले? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप केला होता. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.