Pune District : क्रशरला ६६ लाखांचा दंड; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे काय
Pune District : २०१० पासून सुरू असलेल्या या वादात ग्रामसभांनी २०१५-१६ आणि २०२५ मध्ये क्रेशर बंद करण्याचे ठराव केले होते.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील अतुल स्टोन क्रेशरला पर्यावरणीय नुकसानीप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ६६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.मात्र, क्रेशरमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अतुल स्टोन क्रेशरच्या विरोधात माहिती देण्यासाठी मंचर (ता.आंबेगाव) येथे पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच संजय घोडेकर, श्रीकांत घोडेकर किरण डोके, हिरवाई पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार जेठे उपस्थित होते.हिरवाई पर्यावरण संघटना आणि ग्रामस्थांनी या प्रकरणी हरित लवादाकडे दाद मागितली होती. क्रेशरमुळे शेतजमिनींची सुपीकता कमी झाली असून, काही घरांना तडे गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असतानाही भरपाई मिळालेली नाही.
२०१० पासून सुरू असलेल्या या वादात ग्रामसभांनी २०१५-१६ आणि २०२५ मध्ये क्रेशर बंद करण्याचे ठराव केले होते. तरीही कारवाई झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.सध्या संबंधित क्रेशर बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, क्रेशर मालकावर गुन्हा दाखल करावा आणि दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी, या मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. गरज पडल्यास न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
क्रेशरमुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले असून, घरांनाही तडे गेले आहेत. पंचनामे होऊनही भरपाई मिळत नाही. प्रशासनाने तातडीने नुकसानभरपाई देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.
– संजय घोडेकर, माजी उपसरपंच, महाळुंगे पडवळ.
आंदोलनाचा इशारा
अतुल स्टोन क्रेशरला चालू करण्याबाबत कोणतेही शासकीय पत्र नाही. परंतु महसूल विभागाच्या आशीर्वादाने गेली अनेक वर्ष नागरिकांच्या तक्रारी असतानाही स्टोन क्रेशर चालू कसे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत महसूल विभागाच्या विरोधातही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.





