बीड – पावसामुळे ज्यांच्या घरात पाणी गेल्यामुळे ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्या लोकांना तातडीची मदत म्हणून सध्या 5 हजार रुपये आणि 35 किलो तांदूळ दिले जात आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड, धाराशीव, परभणी यासारख्या जिल्ह्यांमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेले आहे. काही शेतातील पीक थेट पाण्याखाली गेले आहे. याच स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच हे संकट फार मोठे असल्याचे म्हणत केंद्र सरकातर्फे भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. सोबतच त्यांनी आता नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्यास सुरुवात झाल्याचेही सांगितले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे तसेच इतर ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. लोकांना पुन्हा कसे उभे करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. पंचनामे जेवढ्या गतीने करता येतील तेवढ्या वेगाने करा असे निर्देश आम्ही दिले आहेत, असेही पवार यांनी सांगितले.