अवकाळीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३३७ कोटींची मदत

मुंबई- अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकऱ्यांच्या 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.
मकरंद जाधव-पाटील म्हणाले, राज्यातील अनेक जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 59 कोटी 98 लाख 20 हजार, पुणे विभागासाठी 81 कोटी 27 लाख 27 हजार, नाशिक विभागासाठी 85 कोटी 67 लाख 8 हजार, कोकण विभागासाठी 9 कोटी 38 लाख 24 हजार, अमरावती विभागासाठी 66 कोटी 19 लाख 11 हजार आणि नागपूर विभागासाठी 34 कोटी 91 लाख 63 हजार रुपये मदतीचा समावेश आहे.





