बैलांच्या सहाय्याने शेती करणाऱ्यांना ३०,००० रुपये अनुदान, ‘या’ राज्यात ऑनलाइन अर्ज सुरू

जयपूर – राजस्थान सरकारने प्राकृतिक शेतीला चालना देण्यासाठी बैलांच्या सहाय्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ३०,००० रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या संकल्पनेतून कृषि विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून, शेतकऱ्यांसाठी राज किसान साथी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
शेतकरी ई-मित्र किंवा मोबाइल अॅपद्वारे अर्ज करू शकतात. या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल आणि जैविक शेतीलाही प्रोत्साहन मिळेल.
अर्जानंतर १० दिवसांत तपासणी, पुढील १० दिवसांत प्रशासनिक मंजुरी आणि २० दिवसांत प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईल. एकूण ४० दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ३०,००० रुपये जमा होतील. याशिवाय, गोबर गॅस प्लांटसाठीही अनुदान मिळेल. पात्रतेसाठी शेतकऱ्याकडे बैलांची जोडी, अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र, पशु विमा आणि बैलांचे वय १५ वर्षांपेक्षा कमी असावे. मंदिर भूमी संरक्षक पुजारी आणि वनाधिकार पट्टाधारकही अर्ज करू शकतात.
अर्जासाठी आधार, जन आधार, सहा महिन्यांपेक्षा जुनी नसलेली जमाबंदी नक्कल, बैलांसह फोटो, पशु विमा पॉलिसी, आरोग्य प्रमाणपत्र आणि १०० रुपये नॉन-ज्युडिशियल स्टॅम्पवर शपथपत्र अपलोड करावे लागेल. अर्ज प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने मंजूर होतील. पडताळणीत पशुपालन विभागाचे कर्मचारीही सहभागी असतील. मंजुरीनंतर शेतकऱ्यांना मोबाइलवर सूचना मिळेल. या योजनेमुळे बैलांद्वारे शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, अशी अपेक्षा आहे.





