Pune District : माऊलींच्या पालखी रथाला यंदा घुंडरे घराण्याची बैलजोडी

आळंदी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैल जोडी ओढण्याचा मान घुंडरे कुटूंबीयांना मिळालेला आहे. हा मान मिळाल्याने घुंडरे कुटुबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे, सचिन बाळासाहेब घुंडरे यांना हा मान मिळालेला आहे.
विवेक घुंडरे यांनी (जि.सातारा) बावधन येथून राजा प्रधान बैल जोड बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना.खरेदी केला आहे. तसेच दुसरा बैलजोड (सावकार,संग्राम) हिंजवडी येथून उमेश साखरे यांसकडून पाच लाख रुपयांना खरेदी केला आहे.
अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी येथून ५ लाख ५१ हजार रुपयांना बैल मल्हार, आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केला. तसेच दुसरा बैल जोड (माऊलीं शंभू) उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांसकडून २ लाख ५१ हजार रुपयांना खरेदी केला आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांचा शेती मशागत,बैलगाडी ओढणे इ. सराव होत आहे. या बैलांसाठी खुराक शाळूची वैरण,हिरवा चारा,पेंड,खारीक खोबऱ्याचा भुगा,बैल खाद्य मिक्स इ.देत आहेत. बैल मानकरी यांनी यावेळी माहिती सांगितली. दि.२ रोजी या बैल जोडीचे पूजन, मिरवणूक होणार असून जास्तीत जास्त आळंदीकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे मानकरी यांनी आवाहन केले आहे.





