प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर देणार – शिवराजसिंह चौहान

पुणे – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेतंर्गत देशातील, तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था, शिवाजीनगर येथे किसान सन्मान दिनानिमित्त शेतकरी, तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आयसीएआर, नवी दिल्लीचे सहायक महासंचालक डॉ. संजय कुमार सिंह, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोणताही गरीब घरापासून वंचित राहणार नाही, प्रत्येकाला पक्के घर मिळाले पाहिजे, असा संकल्प केला आहे. हा संकल्प आमचे सरकार लवकरच पूर्ण करणार आहे. याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 6 लाख 37 हजार 89 पक्की घरे देण्यात येत आहेत.
आता पुन्हा नव्याने 13 लाख 29 हजार 678 पक्की घरे देण्यात येतील. सर्व मिळून एकूण 19 लाख 66 हजार 767 घरे देण्याची घोषणा ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कार्यक्रमात केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषीमधील पारंपरिक विज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. आज पुन्हा संपूर्ण जग नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहे. नैसर्गिक बाबींचा अधिकाधिक वापर करून उत्पादकता कशी वाढवता येईल, तसेच खाद्यामध्ये विषयुक्त पदार्थांचा वापर कसा कमी करता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राने देखील नैसर्गिक शेतीचे अभियान स्वीकारले असून, 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शेतकऱ्यांना शेतीत प्रयोगशील राहावे लागेल. शेतीचे क्षेत्र कमी झाले असल्याने उत्पादकता वाढवून शेती फायद्याची कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावा लागेल. यामुळे ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ योजनेपासून वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणल्या आहेत. आता त्यांनी ड्रोन दीदीची संकल्पना आणली आहे. अशा प्रकारे शेतीमध्ये परिवर्तन होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.





