Pune District : दिवे घाटात माऊलीच्या रथासाठी झेंडेवाडीची बैलजोडी

राजा- हरण्या ओढणार माऊलींचा रथ
दिवे – योगियांची माउली म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (दि.१९) श्री क्षेत्र आळंदी वरून पंढरपूरच्या दिशेने टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान सुरु झाले आहे. रविवारी (दि.२२) दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात सोहळ्याचा प्रवेश होत आहे. हडपसर वरुन निघाल्यानंतर अवघड घाटातून सोहळ्याच्या मुख्य बैलजोडी बरोबरच इतर बैलजोड्यांची आवश्यकता असते. यासाठी झेंडेवाडी येथील रमेश बबन शिंदे आणि सचिन शिवाजी झेंडे यांची बैलजोडी तयार ठेवली आहे
माउलींच्या पालखी सोहळ्यातील निसर्गमय असा नागमोडी वळणे असलेला दिवे घाट अवर्णनीय असाच आहे. दिवे घाटातून येताना वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत अगदी तल्लीन होवून नाचत गात दिवे घाट पार करतात. माउलींच्या पादुका असतात तो चांदीचा रथ अवजड वजनाचा असल्याने रथ ओढताना एक बैलजोडी अगदी थकून जाते. यासाठी रथावर इलेक्ट्रिक मोटर बसविली आहे. मात्र, तरीही इतर बैलजोड्यांची आवश्यकता भासत असते. मुख्य बैलजोडीबरोबरच झेंडेवाडी येथील आणखी बैलजोड्या लावून रथ घाटातून पार होत असतो.
दरम्यान, अनेक वर्षे झेंडेवाडी येथील रमेश शिंदे यांची बैलजोडी माउलींच्या रथाला दिवे घाट पार करण्यासाठी मदत करीत आहे. यंदा रमेश शिंदे यांचासोबत सचिन झेंडे यांचीही बैलजोडी लावण्यात येणार आहे. दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात पहिलाच झेंडेवाडी येथील विसावाजवळ रमेश शिंदे यांचा राजा आणि सचिन झेंडे यांच्या हरण्या या बैलजोडीची सन्मानपूर्वक पूजा करण्यात आली.
यावेळी रमेश शिंदे, सचिन झेंडे, माजी सरपंच शरद झेंडे, ग्रामपंचायत सदस्य अमर झेंडे, रामदास झेंडे, समीर झेंडे, अजित गोळे, सनी झेंडे, तुषार झेंडे, विकास झेंडे, भाऊसाहेब झेंडे, नवनाथ शेंडे, यश झेंडे, आबासाहेब झेंडे, अशोक झेंडे, संतोष झेंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





