Pune District : छत्रपती कारखान्याकडून २८०० रुपये पहिला हप्ता

भवानीनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या उसाचा पहिला हप्ता प्रतिटन रुपये 2 हजार ८०० देणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत गाळप झालेल्या उसास प्रतिटन रुपये २,८०० प्रमाणे पहिला हप्ता लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणेत येणार आहे व या हंगामातील अंतिम साखर उतारा व साखरेचे दर विचारात घेऊन अंतिम ऊस दर देण्यात येईल. या वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ लाख मे. टन ऊस गळितासाठी उपलब्ध असून कार्यक्षेत्राबाहेरील २ लाख टन असे एकूण १० लाख मे. टन उसाचे गाळप करणेचे संचालक मंडळाने उद्दिष्ट ठरविले आहे.
आत्तापर्यंत ३ लाख ६ हजार ५७२ टन उसाचे गाळप होऊन सरासरी १०.१० टक्के रिकव्हरीने २ लाख ९७ हजार ५०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून १ कोटी ५५ लाख ०३ हजार ७०० युनिटस् वीज निर्मिती झाली असून त्यापैकी अंतर्गत वापरासाठीची वीज वजा जाता ९९ लाख 94 हजार युनिटस् वीज निर्यात झाली आहे. चालू वर्षी कारखान्याने १० लाख मे. टन गाळप गृहीत धरून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेस ॲडव्हान्स वाटप केलेला आहे.
तसेच कारखान्यातील मशिनरी रिपेअरिंग व ओव्हरहॉलिंग इत्यादीसाठी खर्च केलेला आहे. तेव्हा सभासदांच्या मालकीची ही संस्था टिकावी, यासाठी सर्वच सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जास्तीचे गाळप झाले. तर साखर व मोलॅसेस उत्पादन तसेच वीज निर्मिती इत्यादीमध्ये वाढ होईल. पर्यायाने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर पडण्यास मदत होईल.
त्यासाठी सभासदांनी चालू गळीत हंगामात त्यांचा ऊस इतर कारखान्यांना गळितास न देता आपलेच कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे. तेव्हा सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक मुकादम व तोडणी मजूर यांनी मागील हंगाम पार पाडणेसाठी जसे सहकार्य केले, तशाच प्रकारचे सहकार्य हा गळीत हंगाम पार पाडण्यासाठी करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी यावेळी केले.





