“आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला”; अजित पवारांचा धक्कादायक आरोप

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्यावर फोडले आहे. त्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले.
आणि चौकशी करण्यासाठी फाइल तयार करण्यात आली. त्या फाइलवर आर. आर. आबांनी सही केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर हा केसाने गळा कापण्यासारखा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.
तासगावमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे आता महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, इतक्या वर्षात केवळ बेचाळीस हजार कोटी रुपयांची कामे झाली होती. तरी माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप झाला. मात्र आकडा जेवढा मोठा, तितके लोक गंभीरतेने घेतात.
म्हणून आकडा मोठा केला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या आरोपांमुळे माझ्या चौकशीची फाइल तयार झाली. ती फाइल सही करण्यासाठी गृह विभागाकडे गेली. त्यावर आर. आर. पाटील यांनी सही देखील केली. त्या नंतर ही फाइल मुख्यमंत्र्यांकडे गेली.
मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर सही केली नाही. त्याच वेळी आम्ही सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार पडून राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतरच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सही केली आणि मला बोलवून आर. आर. पाटील यांनी सही केल्याचे दाखवले, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
जिवाभावाचा सहकारी असूनही सही
आर. आर. पाटलांनी या चौकशीच्या फाइलवर सही केली, हे मला कळल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटले. आपला जिवाभावाचा सहकारी असून देखील त्यांनी तसे केले.
आपले काहीतरी चुकले असेल, म्हणूनच त्यांनी अशी सही केली असेल. असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.





