MI vs RCB : पहिल्याच सामन्यात आरसीबीची विजयी सलामी! डी क्लार्कच्या ‘मॅचविनिंग’ खेळीने मुंबईचा उडवला धुव्वा

RCB vs MI RCB beat Mumbai Indians WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ च्या सलामीच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने मुंबई इंडियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. आरसीबीच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली ती अष्टपैलू नादिन डी क्लर्क, जिने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईच्या तोंडचा घास हिरावला.
मुंबई इंडियन्सची झुंजार धावसंख्या –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली होती. अमेलिया केर (४), सिव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौर आणि कमलिनी स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची अवस्था ४ बाद ६७ अशी झाली होती. मात्र, सजीवन सजना (४५ धावा, २५ चेंडू) आणि निकोला कॅरी (४० धावा, २९ चेंडू) यांनी खिंड लढवत मुंबईला २० षटकांत ६ बाद १५४ धावांपर्यंत पोहोचवले. आरसीबीकडून नादिन डी क्लर्कने ४ बळी घेतले, तर लॉरेन बेलने अत्यंत कंजूष गोलंदाजी करत केवळ १४ धावा दिल्या.
आरसीबीची पडझड आणि नादिनची झुंजार खेळी –
A #TATAWPL classic in the season opener! 🔥
And we have just begun 😎
What a finish that from Nadine de Klerk! 🤯
Scorecard ▶️ https://t.co/IWU1URl1fr#KhelEmotionKa | #MIvRCB pic.twitter.com/FKyZhLwbto
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 9, 2026
१५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि ग्रेस हॅरिस यांनी आरसीबीला ४० धावांची धडाकेबाज सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत आरसीबीची अवस्था ७ बाद १२१ अशी केली. सामना मुंबईच्या बाजूने झुकलेला असतानाच नादिन डी क्लर्कने सूत्रे हाती घेतली.
हेही वाचा – Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरचा पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विक्रम! शफाली वर्माला मागे टाकत बनली नंबर-१
अंतिम षटकांचा थरार –
विजयासाठी शेवटच्या २ षटकांत आरसीबीला २९ धावांची गरज होती. १९ व्या षटकात ११ धावा आल्यानंतर शेवटच्या ६ चेंडूत १८ धावांचे कठीण आव्हान होते. नादिन डी क्लर्कने (६३ धावा, ४४ चेंडू) प्रेमा रावतच्या साथीने तुफानी फटकेबाजी केली आणि शेवटच्या षटकात १८ धावा कुटत आरसीबीला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. नादिनने आपल्या या मॅचविनिंग खेळीत ७ चौके आणि २ उत्तुंग षटकार ठोकले.





