रूपगंध : वॉटर मेट्रो

रिव्हर क्रूझ आणि सी प्लेननंतर आता केरळच्या कोची येथे देशातील पहिली वॉटर मेट्रोची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. वॉटर मेट्रो ही जलवाहतुकीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या भागासाठी स्वदेशी बनावटीची वॉटर मेट्रो वरदान ठरणार आहे. केरळ, मुंबई, तमिळनाडू, ओडिशा, कोलकता, अंदमान निकोबार, दीव दमण, गोवा, लक्षद्वीप, बिहार यांसारख्या भागात परवडणाऱ्या दरात आगामी काळात जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठी संधी आहे.
संपूर्णपणे भारतीय बनावटीची असणारी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड सिस्टमवरच्या वॉटर मेट्रोची वाहतूक ही नजीकच्या मार्गासाठी उपयुक्त आहे. या प्रकल्पावर 1137 कोटी रुपये खर्च झाले आहेत. वॉटर मेट्रो ही कोची आणि परिसरातील दहा बेटांना जलमार्गाने जोडणार आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने वॉटर मेट्रोची निर्मिती केली आहे. केरळमध्ये होणारा प्रयोग हा देशातील अन्य राज्यांसाठी पथदर्शी राहू शकतो. सध्याच्या काळात केरळ जलवाहतूक विभागाकडून विविध मार्गावर सुमारे 200 बोटींचे संचलन केले जात आहे. पण वेळेचे पालन होत नसल्याने आणि प्रवाशांची सुरक्षा पाहिली जात नसल्याच्या कारणावरून या बोट सेवेवर टीकाही झाली आहे. आता वॉटर मेट्रो सुरू झाल्याने केरळमध्ये जलवाहतुकीत स्पर्धा वाढू शकते. परिणामी सेवेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
भूजल वाहतूक मंत्रालयाच्या मते, देशांतर्गत जलमार्ग हे 14,500 किलोमीटरचे आहे, परंतु यात 3700 किलोमीटरच्या नदी जलमार्गाचा तसेच 900 किलोमीटरच्या सरोवर जलमार्गाच्या विकास झाला. 3700 किलोमीटर नदीमार्गापैकी केवळ 2 हजार किलोमीटर मार्गावर वर्षभर जलवाहतूक सुरू राहते. अन्य मार्गांवर अन्य रुपाने वाहतूक सुरू राहते. त्याचवेळी भारतात जल वाहतूक क्षेत्रात अनेक संधी आहेत. प्रवासापासून मालवाहतुकीपर्यंत ही सेवा स्वस्त आहे. मागील सरकारने देखील प्राथमिक स्वरूपात प्रयत्न केला, परंतु या क्षेत्राचा अपेक्षेप्रमाणे विस्तार झाला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जलवाहतुकीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिक, धार्मिक, आणि सांस्कृतिक पर्यटनाबरोबरच प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने या क्षेत्रात विकासाच्या बऱ्याच संधी आहेत. गेल्या वर्षी वाराणसी ते आसामच्या दिब्रुगडपर्यंत 3200 किलोमीटरच्या मार्गावर गंगाविलास क्रूझची सुरुवात झाली. यानुसार देशात क्रूझ वाहतुकीतील नवीन पर्व सुरू झाले. दोन लांब शहरात असलेल्या नदीमार्गाने क्रूझचा प्रवास करण्याबरोबरच सरकार लहान क्रूझला (सी प्लेन) प्रोत्साहन देत आहे. गुजरात आणि गोव्यात क्रूझ वाहतूक सुरू आहे.
नदीच्या जलमार्गाचा उपयोग करून भारत आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतो. युरोपात अशा प्रकारचे प्रयोग अनेक काळापासून केले जात आहेत. देशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 1986 रोजी भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. देशातील अन्य प्रमुख जल संस्थांत राष्ट्रीय आंतरदेशीय नौवहन संस्था पाटणा, राष्ट्रीय जलक्रीडा संस्था गोवा, इंडियन मेरीटाइम यूनिव्हर्सिटी चेन्नई याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. भारतात गंगा, हुबळी, गंडक, कोसी, महानंदा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, बंगालचा उपसागर, हिंद महासागर, अरबी समुद्र यांसारखे अनेक जलमार्ग उपलब्ध आहेत. त्याचा जलवाहतुकीसाठी उपयोग करता येतो. वॉटर मेट्रोसारख्या प्रकल्पाने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
– विनिता शाह





