रूपगंध : आधुनिक मराठी काव्याचे जनक: केशवसुत

केशवसुतांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखले जाते. इंग्रजी काव्यपरंपरेतील रोमॅंटिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. मराठीत त्यांनी “सुनीत’ या काव्यरचनेचा प्रयोग त्यांनी प्रथमच केला. 15 मार्च हा त्यांचा जन्मदिवस, त्या निमिताने जाणून घेऊयात त्यांच्या कवितांचा परिघ.
कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखले जातात. केशवसुतांच्या जन्म 15 मार्च 1866 रोजी रत्नागिरी नजीक मालगुंड या गावी झाला. त्यांचे वडील केशव दामले हे शिक्षक होते. केशवपंत स्वभावाने निःस्पृही, बाणेदार आणि करारी होते. शिक्षक म्हणून त्यांचा चांगलाच नावलौकीक होता. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र कधीच नांदत नाहीत असे म्हणतात, याचप्रमाणे त्यांचे सर्व आयुष्य दारिद्य्रात गेले. केशवसुत निश्चयी व कुशाग्रबुद्धीचे होते. त्यांचे ज्येष्ठबंधू श्रीधरपंत यांच्याकडून त्यांना कवितेची गोडी लागली व त्यांनी कविता लिहावयास सुरू केली.
संपूर्ण आयुष्य त्यांनी कवितेच्या सानिध्यात घालविले. त्यांनी इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या आवडीचे आंग्ल कवी म्हणजे इमर्सन, शेले, किट्स, वर्डसवर्थ हे होते. संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. कवीने शब्दांबरोबर न वाहवता, कल्पनेशी झगडत राहिले पाहिजे, नुसत्या शब्दांच्या थाटाने कविता होत नसते, शब्दात काव्य नाही, तर ते कल्पनेत आहे असे त्यांचे ठाम मत होते. कवितेचे बाह्यरूप कुठलेही असले तरी, तिचे अंतरंग उदात्त कल्पनांनी व विचारांनी भरलेले पाहिजे तरच तिचे उज्ज्वल स्वरूप प्रकट होईल, एरव्ही नाही असे ते म्हणायचे.
केशवसुतांच्या कविता सुरुवातीला करमणुकीत प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे त्या सुधारक मासिक, मनोरंजन, काव्यरत्नावली यातून प्रसिद्ध झाल्या. केशवसुत हे निसर्गतः कवी होते हे त्यांच्या प्रत्येक कवितेतून प्रतीत होते. त्यांच्या सर्व कविता स्फुट आहेत एखादेतरी मोठे काव्य लिहावे अशी त्यांची आकांक्षा होती, परंतु अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे ती त्यांना तडीस नेता आली नाही. नैऋत्येकडील वारा ही त्यांची आवडती कविता, त्यांनी 1898ला लिहिली जेव्हा ते खान्देशात होते, त्यांचा आवडत्या कोकणापासून दूर.
तो वारा रामजन्मभूमीवरून येतो जो वाहत
हे माझ्या हृदयात येऊनिसवे मी ठाकलो चिंतीत
माझ्या जन्मघरेचि या मग मनी रूपास मी आणि तो
तिचे डोंगर उंच, खोलही नद्या, डोळ्यापुढे पाहतो
नारळी पोफळीच्या बागा, समुद्र यात ते रमतात. दुर्मुखलेला या दिव्य ठिणगी या त्यांच्या जीवनावर आधारित कविता आहेत. वर्गात एकदा त्यांना शिक्षकांनी दुर्मुखलेला असे म्हटले आणि ही काव्यनिर्मिती झाली. केशवसुतांच्या आत्मपर कविता आईकरता शोक दिसतो. मातृवियोगाच्या दुःखात ते लिहितात-
फिरुनी तुझे कोठे ते तीर्थरूप पाहू
पादारजी लोळुनी तव धन्य केवी होऊ
जनाकामागे जागृत, जननी गे
तू दैवत उरलीस, तीही सांप्रत
गेलीस सोडून आम्हा दिन बालका ते
उत्कट भावनेने परिपूर्ण अशी ही कविता आहे. आई, मित्र आप्तेष्ट, जन्मभूमी या सगळ्यांवर अपार प्रेम करणारा कवी, पत्नीच्या बाबतीत उदासीन कसा असेल? खरे पाहिले तर हा काळ अशाप्रकारचे चित्रण करण्यास योग्य नव्हताच. प्रीती मिळेल काहो, समृद्धी, प्रणय-कथन, मयूरासन, ताजमहाल या त्यांच्या प्रेमाच्या कविता होत. कविता आणि कवी या त्यांच्या कवितेवरून सगळ्या जुन्या शृंखला त्यांनी तोडल्यात हे सिद्ध होते. केशवसुत म्हणतात
युवा जैसे तो युवतीस मोहे
तसा कवी हा कवितेस पाहे
तिला जसा तो करितो विनंती
तसा हिला हा करीत सुवृत्ती
आत्मअविष्कार हाच नेहमी काव्यनिर्मितीचा प्रमुख आधार अशी त्यांची ठाम भूमिका होती. 1886 ते 1904 या काळात ते याच ध्यासात मग्न होते. काव्य, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रेम, निसर्ग, विरह, संवेदना या सगळ्यावर त्यांनी कविता लिहिल्या. शाब्दिक कलाकुसरीने नटलेली कविता हे कृत्रिम काव्य आहे असे त्यांना वाटायचे. केशवसुत पुण्यात असले तरीही त्यांचे मन नेहमी कोकणातच रमायचे. सृष्टीसौंदर्याचं वर्णन त्यांनी खूप तन्मयतेनं त्यांच्या कवितातून केलं. त्यांची अगदी सुरुवातीची कविता एक खेडे हे त्याचे अप्रतिम उदाहरण होय. केशवसुत म्हणजे स्वातंत्र्य आणि समता यांची स्वप्ने पाहणारा कवी. तुतारी फुंकणारा नवा शिपाई. तुतारी या कवितेतून त्यांनी सगळ्या जुन्या, अनिष्ट प्रथा सोडण्याचे आवाहन केले आहे. जुन्यारूढी,परंपरा या कालबाह्य झाल्या असून त्या त्यागल्याच पाहिजे अशी त्यांची भावना होती. नवा शिपाई ही कविता तर अगदी स्फूर्तीने भरलेली आहे.
नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे.
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे.
ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा
तोच पतित, कि जे आखडती प्रदेश साकल्याचा
अर्वाचीन मराठी कवितेत केशवसुत इतका वादग्रस्त कवी कोणी झाला नाही. सामाजिक संकल्पनांना भेदून एवढं निर्भीड लेखन करणारा हा कवी 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी येथे प्लेगने वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी मृत्यू पावला.
प्रा. डॉ. गणेश मा. काकांडीकर





