Rohit Sharma Recalls : “१९ वर्षांच्या कारकिर्दीतील ‘तो’ सर्वात काळा आणि कठीण टप्पा..!’, रोहित शर्माने अखेर सोडलं मौन
Rohit Sharma Recalls : रोहित शर्माने खुलासा केला आहे की, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील तो धक्कादायक पराभव, जो ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून जिंकला होता, त्याच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षण होता.

Rohit Sharma Recalls 2023 World Cup Final Defeat Pain 2024 T20 Triumph : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाच्या वेदनांना उजाळा देत एक अत्यंत भावनिक खुलासा केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलग १० सामने जिंकून पोहोचलेल्या टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव झाला होता. मात्र, रोहितच्या मते, त्या हृदयद्रावक पराभवानेच भारतीय संघाच्या मनात विजयाची एक नवी भूक आणि जिद्द निर्माण केली, ज्याच्या जोरावर भारताने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक उंचावला.
१९ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्वात काळा आणि कठीण टप्पा!
१९ नोव्हेंबर २०२३ ची ती रात्र आठवताना रोहित म्हणाला की, “माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १९ वर्षांमधील तो सर्वात कठीण आणि अंधकारमय काळ होता. २००७ मधील पदार्पणापासून मी असा प्रसंग कधीही अनुभवला नव्हता. २०१२ च्या श्रीलंका दौऱ्यातील माझे अपयश हा माझा वैयक्तिक प्रश्न होता; पण २०२३ चा पराभव हा संपूर्ण देशाचे स्वप्न भंगवणारा होता. कारण तो एकदिवसीय विश्वचषक जिंकणे ही संपूर्ण भारताची इच्छा होती.”
“आम्ही हरू शकतो असे कधी वाटलंच नव्हते”; रोहितची खंत
रोहितने पुढे सांगितले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले होते, त्यामुळे त्या पराभवाची जखम अधिक खोलवर झाली. “आम्ही इतके अप्रतिम खेळत होतो की आम्ही अंतिम सामना हरू शकतो, अशी पुसटशी शंकाही कोणाच्या मनात नव्हती. पण खेळ याच गोष्टी शिकवतो; जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही सुरळीत सुरू आहे, नेमके त्याच वेळी मैदानात अशी अनपेक्षित घटना घडते जी तुम्हाला खाली खेचते,” असे रोहितने स्पष्ट केले.
त्या पराभवाने दिली नवी आग; बारबाडोसमध्ये संपवला ११ वर्षांचा दुष्काळ!
अपयश हे यशापेक्षा माणसाला खूप जास्त शिकवते, असा विश्वास व्यक्त करत रोहितने नमूद केले की, जर २०२३ मध्ये तो पराभव झाला नसता, तर २०२४ च्या टी-२० विश्वचषकात खेळाडूंच्या डोळ्यांत ती तडप दिसली नसती. अहमदाबादच्या जखमेने दिलेल्या आगीमुळेच २९ जून २०२४ रोजी बारबाडोसच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.





