Rohit Sharma : रोहितने खरेदी केली कोट्यवधींची नवी कोरी कार! नंबरप्लेटशी आहे खास कनेक्शन, पाहा VIDEO

Rohit Sharma Buys Lamborghini Urus SE : भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच आपल्या कार संग्रहात एका नव्या आलिशान लॅम्बॉर्गिनी उरुस SE ची भर घातली आहे. आयपीएल २०२५ दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहित इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत नव्हता. मात्र, तो ओव्हल येथील कसोटी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. खूप दिवसांच्या सुट्टीनंतर भारतात परतताच त्याने ही ५.२५ कोटी रुपये किंमतीची लक्झरी कार खरेदी केली, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.
रोहितने घरेदी केली नवीन कार –
रोहित शर्माला स्पोर्ट्स कार्सची विशेष आवड आहे. यापूर्वी त्याच्याकडे लॅम्बॉर्गिनी उरुसचं एक मॉडेल होतं, ज्याचा रंग निळा आणि नंबर २६५ होता. आता त्याने या कारचा अपग्रेडेड व्हर्जन असलेली लॅम्बॉर्गिनी उरुस SE खरेदी केली. या कारची मुंबईतील एक्स-शोरूम किंमत ४.५७ कोटी रुपये असून, ऑन-रोड किंमत ५.२५ कोटी रुपये आहे. इतक्या किंमतीत मुंबईतील चांगल्या भागात एक आलिशान घर खरेदी करता येईल, असे बोलले जात आहे.
या कारची नंबर प्लेट आहे खूपच खास –
🚨NEW ORANGE LAMBORGHINI OF ROHIT SHARMA🚨
“Rohit Sharma bought a new orange colour Lamborghini Urus Se which has been delivered in Mumbai and bRO will be seen driving it soon.” pic.twitter.com/vY0aWTzGZZ
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 9, 2025
रोहितच्या नव्या लॅम्बॉर्गिनी उरुस SE ची नंबर प्लेटही खास आहे. कारचा नंबर ३०१५ असा आहे, ज्यामागे खास कारण आहे. या नंबरमधील पहिली दोन अंक (३०) त्याच्या मुलीच्या, समायरा हिच्या जन्मतारखेशी (३० डिसेंबर) संबंधित आहेत, तर उरलेले दोन अंक (१५) त्याचा मुलगा अहानच्या जन्मतारखेशी (१५ नोव्हेंबर) जोडलेले आहेत. विशेष म्हणजे, ३० आणि १५ या अंकांची बेरीज (३०+१५=४५) ही रोहितच्या जर्सी क्रमांकाशी जुळते. या अनोख्या नंबर प्लेटमुळेही ही कार चर्चेचा विषय ठरली आहे.
सुट्टीवरुन परतताच ट्रोलिंगचा करावा लागला सामना –
भारतात परतताच रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विमानतळावरून बाहेर पडताना काही चाहत्यांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले, ज्यामध्ये तो काहीसा जाड आणि पोट वाढलेला दिसत होता. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुट्टीनंतर परतलेल्या रोहितच्या या नव्या लूकमुळे तो ट्रोल झाला.





